ठळक मुद्देमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार चोरी झाल्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी अनिल बैजल यांना पत्र लिहिलं होतंपत्राला उत्तर देताना अनिल बैजल यांनी अरविंद केजरीवालांना फटकारलं आहेकार पार्किंगपासून 100 मीटर दूर का उभी केली होती ? तसंच त्यामध्ये कोणतं सेक्यूरिटी डिव्हाईस का नव्हतं ? असे प्रश्न अनिल बैजल यांनी उपस्थित केले

नवी दिल्ली - कार चोरीप्रकरणी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फटकारलं आहे. कार पार्किंगपासून 100 मीटर दूर का उभी केली होती ? तसंच त्यामध्ये कोणतं सेक्यूरिटी डिव्हाईस का नव्हतं ? असे प्रश्न नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार चोरी झाल्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी अनिल बैजल यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राला उत्तर देताना अनिल बैजल यांनी हे प्रश्न विचारत फटकारलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी पत्रातून कायदा - सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हा उपस्थित केलं होतं. 

अरविंद केजरीवाल यांना फटकारताना अनिल बैजल यांनी अरविंद केजरीवाल पोलिसांना सहकार्य करतील, तसंच दिल्लीकरांमध्ये कार पार्किंगमध्ये उभी करणे आणि त्यामध्ये सेक्यूरिटी डिव्हाईस वापरण्यासंबंधी जागरुकरता पसरवतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याशिवाय मुख्यमंत्री पोलिसांचं मनोबल वाढवतील, आणि चोरी झालेली कार दोन दिवसांत शोधून काढल्याबद्दल त्यांचे आभारही मानतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

13 ऑक्टोबर रोजी अरविंद केजरीवाल यांनी पत्र लिहिलं होतं. 'गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीमधील कायदा - सुव्यवस्था बिघडत आहे. पोलिस आणि कायदा-सुव्यवस्था तुमच्या अख्त्यारित येत. कृपया सिस्टमला अजून मजबूत करण्याचा प्रयत्न करा. आम्ही सहकार्य करण्यासाठी तयार आहोत', असं केजरीवालांनी पत्रात लिहिलं होतं. 

अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली निळ्या रंगाची वॅगन-आर (Wagon R) कार पोलिसांना सापडली आहे. दिल्ली सचिवालयाच्या बाहेरुन ही कार चोरीला गेली होती. गाझियाबादच्या मोहननगरमधून पोलिसांनी कार ताब्यात घेतली. पोलिसांना कारमध्ये तलवार सापडली होती.

दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्विकारण्यापूर्वी अरविंद केजरीवाल या कारचा वापर करत होते. २०१३ मध्ये दिल्लीचे ४९ दिवसांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हीच कार वापरली होती. भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनावेळी केजरीवाल यांनी या आयकॉनिक कारचा सर्वाधिक वापर केला होता. त्यानंतर त्यांनी ही कार हरयाणातील आम आदमी पार्टीचे नेते नवीन जयहिंद यांना वापरायला दिली होती. आपल्या कॉमन मॅन इमेजला साजेशी गाडी म्हणून या कारचा केजरीवाल वापर करत. सध्या आम आदमी पक्षाच्या मीडिया सेलकडून या कारचा वापर होत होता. केजरीवाल सध्या इनोव्हामधून फिरतात. 

गुरुवारी दिल्ली सचिवालयाच्या बाहेरुन वॅगन-आर चोरी झाली होती. सचिवालयाबाहेर कार पार्क करण्यात आली आहे. रात्री एक वाजता कार आपल्या जागेवर नसून, चोरी झाल्याचं लक्षात आलं. 

2015 रोजी केजरीवाल यांची ही कार चर्चेत आली होती. आम आदमी पक्षाचे समर्थक कुंदन शर्मा यांनी 2013 रोजी ही कार केजरीवाल यांना गिफ्ट म्हणून दिली होती. मात्र आम आदमी पार्टीतून प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना काढल्यामुळे केजरीवाल यांच्यावर नाराज झालेल्या कुंदन शर्मा यांनी ही कार परत मागितली होती.