मनाली, दि. 13 - हिमाचल प्रदेशातील मंडी येथे भूस्खलन होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याने  या बसमधून प्रवास करत असलेले अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  काल मध्यरात्री हिमाचल प्रदेशातील मंडी येथे हा भीषण अपघात झाला आहे. 
भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या बसपैकी एक बस चंबा येथून मनाली येथे जात होती. तर दुसरी मनाली येथून कटरा येथे जात होती. या बस मंडी येथे आल्या असताना हा अपघात झाला. हिमाचल प्रदेशचे परिवहनमंत्री जी. एस. बाली यांनी या अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेत जवळपास 50 लोकांचा मृत्यू झाला असावा, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. 
 दरम्यान,  दुर्घटनेनंतर मार्गावरील सुमारे 250 मीटर परिसरात माती साचली असून, त्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. तसेच दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अपघातानंतर अनेक लोक मातीच्या ढिगाखाली गाडले गेले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.