Kulbhushan Jadhav's mother did not let Pakistan speak in Marathi, closed the intercom - Sushma Swaraj | कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या बुटात चीप होती, मग पाकिस्तानी विमानतळावर का सापडली नाही ? - सुषमा स्वराज

नवी दिल्ली -  कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवर बोलताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी अत्यंत कठोर शब्दात पाकिस्तानवर प्रहार केला. कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईला पाकिस्तानात अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पाकिस्तानने जाधव कुटुंबांच्या मानवधिकाराचे उल्लंघन केले असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला. 

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांनी 25 डिसेंबरला पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडला.  सुरक्षेच्या नावाखाली कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीचे कपडे बदलण्यात आले. कुलभूषण जाधव यांची आई नेहमी साडी परिधान करते  पण पाकिस्तानने त्यांना ड्रेस घालायला भाग पाडला असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. 

कुलभूषण यांची आई अवंती जेव्हा त्यांच्यासमोर गेली तेव्हा तिच्या गळयात मंगळसूत्र आणि डोक्यावर टिकली नव्हती. त्यामुळे आपल्या वडिलांचे काय झाले अशी शंका कुलभूषण यांच्या मनात आली व त्यांनी  बाबा कसे आहेत ? असा पहिला प्रश्न आईला विचारला. मराठी ही जाधव कुटुंबाची मातृभाषा आहे. मातृभाषेत संवाद साधणे केव्हाही सोपे पडते. त्यामुळे कुलभूषण यांच्या आईने त्यांच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पाकिस्तानने त्यांचा इंटरकॉम फोन बंद केला.  

पाकिस्तानने सुरक्षेच्या नावाखाली जाधव यांच्या पत्नीचे बूट जप्त केले आहेत. त्या बुटांमध्ये धातूची चीप असल्याच्या बातम्या आता पाकिस्तानातून येत आहेत. पाकिस्तानात यावर काहीतरी कट शिजत असल्याची शक्यता स्वराज यांनी व्यक्त केली. जाधव यांच्या पत्नीने एअर इंडियाच्या विमानाने दुबई तिथून एमिराटसच्या विमानाने पाकिस्तानात गेल्या. जर त्यांच्या पत्नीच्या बुटामध्ये चीप होती मग ती चीप पाकिस्तानी विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना कशी सापडली नाही ? असा सवाल स्वराज यांनी विचारला. पाकिस्तानने त्यांच्या देशातील प्रसारमाध्यमांना जाधव कुटुंबाला त्रास देण्याची संधी दिल्याचा आरोप त्यांनी केला.