ठळक मुद्देरुग्णालयात प्रवेश करण्यासाठी किरण बेदी यांनी भिंतीवरुन उडी मारलीरुग्णालयाला भेट देण्यासाठी किरण बेदी अधिका-यांसोबत पोहोचल्या होत्यातिथे पोहोचल्यानंतर गेटची चावी हरवली असल्याचं अधिका-यांचं लक्षात आलं

नवी दिल्ली - पुडुचेरीच्या नायब राज्यपाल असलेल्या किरण बेदी यांना पोलीस दलातून निवृत्त होऊन अनेक वर्ष झाली असली तरी, आजही त्या एकदम फिट आहेत. गुरुवारी एका सरकारी रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेल्या असता याचा अनुभव तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचा-यांना आला. झालं असं की, रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी किरण बेदी यांनी भिंतीवरुन उडी मारली. महत्वाचं म्हणजे, कशीचीही पर्वा न करता किंवा भिती बाळगता त्या भिंतीवर चढल्या आणि उडी मारुन रुग्णालयात प्रवेश केला. त्यांना पाहून उपस्थित मात्र आश्चर्यचकित झाले होते. 

रुग्णालयाला भेट देण्यासाठी किरण बेदी अधिका-यांसोबत पोहोचल्या होत्या. मात्र तिथे पोहोचल्यानंतर गेटची चावी हरवली असल्याचं अधिका-यांचं लक्षात आलं. खूप शोध घेऊनही चावी सापडत नव्हती. अखेर भिंत चढून जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याच शिल्लक नव्हता. 68 वर्षीय किरण बेदी यांनी भिंत चढून, वय आपल्या आड येत नसल्याचं सिद्ध केलं. 

किरण बेदी या भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. एका मुर्तीची पाहणी करण्यासाठी किरण बेदी रुग्णालयात आल्या होत्या. एका छताखाली, साडे तीन फूट विटांची भिंत उभी करत ही मुर्ती ठेवण्यात आली होती. पण गेटची चावी नसल्याने किरण बेदी आणि रुग्णालय प्रशासनाला खूप वेळ वाट पहावी लागली. यानंतर नायब राज्यपाल किरण बेदी यांनी थेट भिंतीकडे मोर्चा वळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

आता नायब राज्यपालच भिंत चढू जात आहेत म्हटल्यावर इतर अधिका-यांपुढेही काहीच पर्याय नव्हता. यानंतर जिल्हाधिकारी आर केशवन, वरिष्ठ पोलीस अधीक्षक व्ही जे चंद्रन आणि तिथे उपस्थित अधिका-यांनीही किरण बेदींचं अनुकरण केलं.

रुग्णालयात प्रचंड अस्वच्छता असून लवकरात लवकर साफसफाई करण्याचा आदेश किरण बेदी यांनी अधिका-यांना दिला आहे. किरण बेदी यांनी यावेळी काही रुग्णांचीही भेट घेतली. यानंतर अधिका-यांसोबत बैठक घेत रुग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी कोणती पाऊलं उचलावीत यासाठी चर्चा केली.