Kerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:00 AM2018-08-22T02:00:42+5:302018-08-22T06:42:07+5:30

Kerala Floods: केंद्राकडे केली मागणी; नैसर्गिक आपत्तीवर चर्चा करण्यास विधानसभेचे खास अधिवेशन

Kerala floods: Special financial assistance of Rs 2600 crore to Kerala | Kerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य

Kerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य

googlenewsNext

तिरुवनंतपुरम : मुसळधार पाऊस व पुरामुळे प्रचंड वित्त व जिवितहानी सोसावी लागलेल्या केरळने या स्थितीतून सावरण्यासाठी केंद्राकडे २६०० कोटी रुपयांची विशेष आर्थिक मदत मागितली आहे. याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत संमत करण्यात आला. मनरेगा या रोजगार योजनेसह केंद्राच्या विविध योजनांच्या अंतर्गत राज्याला ही मदत देण्यात यावी, असेही मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे. केरळ विधानसभेचे एक दिवसाचे खास अधिवेशन ३० आॅगस्ट रोजी होणार असून त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात उद््भवलेल्या गंभीर स्थितीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. पुराचे पाणी ओसरु लागले आहे. विस्थापित लोक घरी परतू लागले आहेत. केरळमध्ये पाऊस व पुरामुळे सुमारे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य दोन मंत्र्यांनी मिळून या राज्याला हंगामी ६८० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या कृषीकर्जाच्या परतफेडीला एक वर्षासाठी स्थगिती देण्याचे बँकांनी ठरविले आहे.

कर्जाच्या मर्यादेत वाढ करा
नैसर्गिक आपत्तीने झालेल्या हानीमुळे राज्यातील १४ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर इमारती व अन्य पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीची कामे हाती घ्यावी लागणार असून त्यासाठी कर्ज घेण्याच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणीही केरळ सरकारने केंद्राकडे केली आहे. सध्या राज्याच्या सकल उत्पन्नाच्या ३ टक्के इतकेच कर्ज घेण्याची मुभा आहे ती ४.५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याला पुनर्बांधणीच्या कामांसाठी खुल्या बाजारातून साडेदहा हजार कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज घेणे शक्य होईल.

बकरी इद, ओनमवर पाणी
२५ आॅगस्ट येत असलेला ओनम हा महत्त्वाचा सण साजरा करण्याच्या मन:स्थितीत केरळमधील जनता नाही. या सणानिमित्त आयोजिलेले कार्यक्रम रद्द करून ते पैसे मदतनिधीसाठी देण्यात येणार आहेत. बुधवारी बकरी इद हा सणही फारशा उत्साहाने साजरी होईल अशी चिन्हे नाहीत.

डॉक्टर, नर्सेसची गरज
केरळमध्ये आता लाखो लोकांच्या उद््ध्वस्त झालेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार ही मंडळी लागणार आहेतच पण रोगराई फैलावू नये यासाठी उपाययोजना करण्याकरिता मोठ्या संख्येने डॉक्टर, नर्सेस यांची सेवाभावी मदत राज्याला हवी आहे असे केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी म्हटले आहे.

विमानतळाचे नुकसान
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाचे २२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. धावपट्टीवरच पाणी शिरल्याने हा विमानतळ २७ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.

मदतीचा ओघ सुरुच
देशभरातील रेल्वेच्या कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार, मारुती सुझुकीच्या कर्मचाºयांनी ३.५ कोटी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे ठरविले आहे. आयटीसी, कोका कोला, हिंदुस्थान लिव्हर आदी १२ कंपन्यांनी पिण्याचे पाणी, अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू पाठविल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी कोची बंदरात देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. या वस्तूंची साठवणूक करण्यासाठी कोची पोर्ट ट्रस्टने दोन गोदामे उपलब्ध करुन दिली आहेत.

यूएई देणार ७०० कोटींची मदत
संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) केरळला ७०० कोटी रुपयांची मदत देण्याचे ठरविले आहे. अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेग अल नह्यान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन ही माहिती दिली. यूएईमध्ये केरळमधील हजारो नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांच्यामुळे विकासाला जी चालना मिळाली त्याचे स्मरण ठेवून यूएईने नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस केरळला मदतीचा हात पुढे केला आहे.

पाच दिवसांत १.६३ लाख नागरिकांची सुखरूप सुटका
१०.७८ लाख लोक विस्थापित झाले असून त्यामध्ये २.१२ लाख महिला, १२ वर्षांखालील १ लाख मुलांचा समावेश आहे. गेल्या पाच दिवसांत पुरात अडकलेल्या १.६३ लाख नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

Web Title: Kerala floods: Special financial assistance of Rs 2600 crore to Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.