काश्मीरमधील बारामुल्ला येथे लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 06:27 PM2018-08-08T18:27:44+5:302018-08-08T18:40:55+5:30

काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

Kashmir : Four terrorists have been gunned down by security forces | काश्मीरमधील बारामुल्ला येथे लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमधील बारामुल्ला येथे लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा

Next

श्रीनगर - नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे.  काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबादच्या जंगलात लष्कर आणि लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये आज चकमक उडाली होती. दरम्यान ही चकमक अद्याप सुरू असून, अजून एक दहशतवादी लपून बसलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. 


रफियाबादच्या जंगलात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने परिसराला घेराव घातला. तसेच शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने बेछुट गोळीबार करण्यास सुरुवात केली. लष्कराकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. ज्यात चार दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी नियंत्रण रेषा पार करून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान, या कारवाईनंतर नियंत्रण रेषेजवळील भागात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर बारामुल्ला- उरी रोडवर एका दहशतवाद्याला ग्रेनेडसह अटक करण्यात आली आहे.  

दरम्यान, पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी मंगळवारी हाणून पाडला होता. जवानांच्या या धाडसी कारवाईत मंगळवारी पहाटे चार अतिरेकी ठार झाले होते, या मोहीमेदरम्यान मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आले. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्यही ही कारवाई मध्यरात्री सुरू झाली होती.
कौस्तुभ राणे हे मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडचे रहिवासी होते. त्यांच्याखेरीज हवालदार जमी सिंग, हवालदार विक्रमजीत व रायफलमॅन मनदीप हेही या कारवाईमध्ये हुतात्मा झाले आहेत. कौस्तुभ राणेंबरोबरच हे तिघेही लष्कराच्या ३६ राष्ट्रीय रायफल्सचा भाग होते.

 

Web Title: Kashmir : Four terrorists have been gunned down by security forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.