कर्नाटकी त्रांगडे कायम, सरकारचा फैसला आज, भाजपचे अहोरात्र धरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 06:14 AM2019-07-19T06:14:31+5:302019-07-19T06:14:49+5:30

१६ आमदारांच्या राजीनाम्याने कोसळण्याच्या बेतात असलेल्या एच. डी. कुमारस्वामी सरकारचे भवितव्य अधांतरी ठेवून कर्नाटकमधील सत्तानाट्याने गुरुवारी अनपेक्षितपणे नवे वळण घेतले.

Karnataka politics crises, the government today Trust of motion | कर्नाटकी त्रांगडे कायम, सरकारचा फैसला आज, भाजपचे अहोरात्र धरणे

कर्नाटकी त्रांगडे कायम, सरकारचा फैसला आज, भाजपचे अहोरात्र धरणे

Next

बंगळुरू : सत्ताधारी आघाडीतील १६ आमदारांच्या राजीनाम्याने कोसळण्याच्या बेतात असलेल्या एच. डी. कुमारस्वामी सरकारचे भवितव्य अधांतरी ठेवून कर्नाटकमधील सत्तानाट्याने गुरुवारी अनपेक्षितपणे नवे वळण घेतले. सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान न घेताच विधानसभा अध्यक्षांनी सभागृह शुक्रवारपर्यंत तहकूब केले. याचा निषेध म्हणून ‘जोपर्यंत मतदान होणार नाही तोपर्यंत हलणार नाही’, असे जाहीर करून सत्तातुर भाजपच्या सदस्यांनी विधानसभेतच अहोरात्र धरणे सुरू केले.
आधी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सकाळी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. परंतु त्यावर चर्चा होण्याऐवजी नवनवे मुद्दे काढून सत्ताधारी व विरोधी भाजप यांच्यात दिवसभर आरोप-प्रत्यारोप व त्यावरून धिंगाणा होत राहिला. काहीही करून ठरावावरील मतदान होता होईतो लांबविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता, तर मध्यरात्र झाली तरी चालेल, पण मतदान आजच व्हायला हवे, असा भाजपचा आग्रह होता.
ठराव मांडल्यावर सर्वप्रथम काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. आपापल्या सदस्यांना ‘व्हिप’ काढणे व त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे हा प्रत्येक पक्षाचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु बंडखोर आमदारांना गैरहजर राहण्याची मुभा देणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने घटनात्म पेच निर्माण झाला आहे. अध्यक्षांनी आधी याचा निर्णय केल्याशिवाय विश्वासदर्शक ठराव तहकूब ठेवला जावा, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून बरीच खडाजंगी झाली. मला कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल, असे अध्यक्षांनी सांगितले.
यानंतर श्रीमंत पाटील या आमच्या आमदारास भाजपने पळवून नेल्याच्या काँग्रेसच्या आरोपावरून गोंधळाचे दुसरे पर्व सुरू झाले. हे श्रीमंत पाटील पक्षाच्या इतर आमदारांसोबत रिसॉर्टमध्ये होते. पण बुधवारी रात्री ते अचानक ‘गायब’ झाले व एकदम मुंबईत प्रकटले. प्रकृती बिघडल्याने त्यांना आधी बॉम्बे इस्पितळात व नंतर सेंट जॉर्जेस इस्पितळात दाखल केले गेले.
त्यांचा स्ट्रेचरवर झोपलेल्या अवस्थेतील फोटो दाखवून काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपच्या नावाने शिमगा सुरू  केला. असाच गोंधळ आणखी काही काळ सुरु राहिल्यावर विधानसभा अध्यक्षांनी दु. ३पर्यंत सभागृह तहकूब केले. दरम्यानच्या काळात विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी अ‍ॅडव्होकेट जनरलना बोलावून घेतले व त्यांचा कायदेशीर सल्ला घेतला. तर भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ राजभवनावर जाऊन राज्यपाल वजूभाई वाला यांना भेटले. थोड्या वेळाने राज्यपालांकडून पत्ररूपाने विधानसभा अध्यक्षांना एक ‘संदेश’ पोहोचविण्यात आला. त्यात राज्यपालांनी म्हटले होते की, मुख्यमंत्र्यांनी सदासर्वकाळ सभागृहाचा विश्वास संपादन केलेला असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर गुरुवारचा दिवस संपण्याआधीच मतदान घेतले जावे.
दुपारी सभागृह पुन्हा सुरु झाल्यावर राज्यपालांचे हे पत्र आधीपासून सुरु असलेल्या खडाजंगीत आणखी तेल ओतणारे ठरले. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांना व सभागृहाला असा आदेश देऊच कसा शकतात, असा सवाल करत सत्ताधाºयांनी विश्वासदर्शक ठराव रोखून धरला. सायंकाळपर्यंत हेच चित्र कायम राहिले. शेवटी चर्चा वा मतदान न होताच अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. (वृत्तसंस्था)
>आज दुपारपर्यंतची मुदत
विधानसभा अध्यक्षांनी सभागृह तहकूब केल्यानंतर राज्यपाल
वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पत्र लिहून शुक्रवारी
दु. १.३० वाजेपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला.

Web Title: Karnataka politics crises, the government today Trust of motion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.