Karnataka Floor Test : जनादेश आम्हाला, बहुमताअभावी राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 04:18 PM2018-05-19T16:18:45+5:302018-05-20T00:44:58+5:30

येडियुरप्पा यांचे भाषण : १५0 जागा मिळवून भाजपा विजयी होईल

Karnataka CM BS Yeddyurappa resigns ahead of Floor Test | Karnataka Floor Test : जनादेश आम्हाला, बहुमताअभावी राजीनामा

Karnataka Floor Test : जनादेश आम्हाला, बहुमताअभावी राजीनामा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करणे अशक्य असल्याचे लक्षात आलेल्या मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी विश्वासदर्शक ठराव न मांडताच राजीनाम्याची घोषणा केली. त्याप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी राज्यातील जनतेने भाजपलाच सर्वाधिक जागा दिल्या होत्या, काँग्रेस व जनता दलाला नाकारले होते, असा दावा केला. पण आम्हाला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११३ जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. अर्थात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील आणि भाजपा १५0 हून अधिक जागा मिळवून विजयी होईल, असेही ते म्हणाले.
तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या येडियुरप्पा यांना अवघ्या अडीच दिवसांतच राजीनामा द्यावा लागला. तरीही मी राज्यभरात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जनतेचे प्रेम जिंकण्यात मी यशस्वी झालो, जनतेने आमच्या प्रयत्नांना साथ दिली, असा दावा करीत त्यांनी राज्यातील साडेसहा कोटी जनतेला वंदन केले. ते म्हणाले की, मी शेवटच्या श्वासापर्यंत कर्नाटकच्या विकासासाठी, शेतकरी-गरीब जनतेसाठी लढत राहीन, पुन्हा जनतेत जाऊन विजय मिळवेन.
माझ्याकडे १०४ आमदार आहेत. राज्याच्या जनतेने काँग्रेस-जेडीएसला नाकारले. त्या दोघांना जनादेश नाही. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आमचा सर्वात मोठा पक्ष असल्यानेच राज्यपालांना मला सरकार स्थापनेसाठी बोलावले, असे सांगून येडियुरप्पा म्हणाले की, आज माझी अग्निपरीक्षा आहे. संघर्ष माझ्यासाठी नवा नाही. आतापर्यंत मी अनेक लढाया लढलो आहे. मी राज्याच्या जनतेला आश्वासन देतो की जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत सगळीकडे जाईन, पुन्हा जिंकून येईन. निवडणुका कधी होतील माहीत नाही. पाच वर्षांनी होतील वा लगेचही होऊ शकतील. त्यावेळी भाजपाला १५० जागा मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन.
सर्वच आमदारांना अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करण्याचे आवाहन मी केले होते. पण त्यांनी सदस्यांना बंदिस्त करून ठेवले. कुटुंबीयांपासून दूर ठेवले. ते मला पाहवले नाही. अशा पद्धतीने मी काम करूच शकत नाही, असे नमूद करून ते म्हणाले की, सत्तेत असलो वा नसलोे तरी मी लढतच राहीन. लोकशाहीमध्ये मतदार हाच राजा असतो. त्याने दिलेला निर्णय मला मान्य आहे. जनतेने जे प्रेम मला दिले, ते मी कधीच विसरू शकणार नाही.
राज्यातील शेतकºयांचे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे मी ठरवले होते. तशी घोषणाही केली होती. ती आता अंमलात येणार नाही. दीड लाख शेतकºयांसाठी पाण्याची व्यवस्था देण्याची माझी योजना होती. सहा नद्या जोडून पाण्याची समस्या दूर करण्याचे मी ठरवले होते. मी शेतीमालाला किमान आधारभूत किंमतही देणार होतो. पण माझ्याकडे स्पष्ट बहुमत नसल्याने मला राजीनामा द्यावा लागत आहे. मात्र लोकसभेच्या कर्नाटकातील २८ पैकी २८ जागा आम्ही जिंकू, असे ते म्हणाले. स्पष्ट बहुमत नसल्याने मी विश्वासदर्शक ठराव मांडण्याऐवजी राज्यपालांकडे जाऊ न पदाचा राजीनामा देत आहे, असे सांगताना येडियुरप्पा काहीसे भावनाविवश झाल्याचे दिसत होते.

राष्ट्रगीत सुरू असताना अध्यक्ष, आमदार बाहेर
विधानसभेचे कामकाज संपताना राष्ट्रगीत होते. पण भाषणाद्वारे राजीनाम्याची घोषणा करून येडियुरप्पा राष्ट्रगीत होण्याआधी निघून गेले. त्यांच्यापाठोपाठ अनेक आमदारही निघाले. राष्ट्रगीत सुरू असताना हंगामी अध्यक्ष के. जी. बोपय्या व भाजपाचे आमदार सभागृहातून बाहेर पडत होते. काँग्रेसचे काही आमदारही त्यावेळी बाहेर पडताना दिसत होते.

काँग्रेस, भाजपाचे बडे नेते गॅलरीत
विश्वासदर्शक ठरावावर कसे मतदान होईल, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र जेवणाच्या सुटीनंतर सभागृहाचे कामकाज होण्यापूर्वीच येडियुरप्पा यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्याचवेळी राजीनाम्याचा निर्णय झाला होता.विश्वासदर्शक ठराव मांडण्याआधी येडियुरप्पा भाषण करणार असल्याचे स्पष्ट झाले, तेव्हाच ते थेट राजीनाम्याची घोषणा करणार असल्याचा अंदाज सर्वांना आला. तरीही विधानसभेचे कामकाज पाहण्यासाठी गॅलरीत गर्दी झाली होती. राज्यपालांच्या पाहुण्यांसाठी असलेल्या गॅलरीत लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद, सरचिटणीस अशोक गेहलोत तसेच केंद्रीय मंत्री अनंतकुमार व येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीय असलेल्या उषा करंदलाजे बसल्याचे दिसत होते. कामकाजाआधी त्यांच्या विनोद, गप्पा सुरू होत्या.

Web Title: Karnataka CM BS Yeddyurappa resigns ahead of Floor Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.