यूपीबाहेर 'असं' पहिल्यांदाच घडलं; कर्नाटकच्या मंत्रिमंडळात 'हत्ती'चं पाऊल पडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 03:59 PM2018-06-06T15:59:29+5:302018-06-06T15:59:29+5:30

कर्नाटकमध्ये मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न

Karnataka BSP set to have its first minister outside UP | यूपीबाहेर 'असं' पहिल्यांदाच घडलं; कर्नाटकच्या मंत्रिमंडळात 'हत्ती'चं पाऊल पडलं!

यूपीबाहेर 'असं' पहिल्यांदाच घडलं; कर्नाटकच्या मंत्रिमंडळात 'हत्ती'चं पाऊल पडलं!

Next

बंगळुरु: कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न होत आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या उपस्थितीत राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कुमारस्वामी यांचे भाऊ एच. डी. रेवाना यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. याशिवाय बहुजन समाज पक्षाच्या एका आमदारानंही मंत्रिपदाची शपथ घेतली. कर्नाटकमध्ये बसपाचा एकच आमदार निवडून आला आहे. त्यालाही काँग्रेस, जेडीएसनं मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. 

मायावती यांच्या पक्षाचा एकच उमेदवार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झाला. बसपाच्या तिकीटावर एन. महेश निवडून आले. त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. उत्तर प्रदेशबाहेर कोणत्याही राज्याच्या मंत्रिमंडळात बसपाला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी उत्तर प्रदेश वगळता बसपाला कोणत्याही राज्यात मंत्रीपद मिळालेलं नाही. कर्नाटकमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यात बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनी मोठी भूमिका बजावली होती. भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यावर मायावतींनी थेट काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींना फोन केला होता. तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसला काँग्रेसनं पाठिंबा द्यावा, असा सल्ला मायावती यांनीच सोनिया यांना दिला होता. 

कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेच्या चाव्या मिळू नये, यासाठी मायावतींनी जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याशीही संपर्क साधला होता. काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारण्याचा सल्ला मायावतींनी देवेगौडा यांना दिला. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला कर्नाटकमध्ये सत्ता मिळवता आली नाही. याचंच बक्षीस बसपाला मिळालं आहे. केवळ एक आमदार निवडून येऊनही बसपाला कर्नाटकमध्ये मंत्रीपद मिळालं आहे. 
 

Web Title: Karnataka BSP set to have its first minister outside UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.