कर्नाटकात पुन्हा सत्तेचं नाटक; 'ऑपरेशन लोटस'मुळे काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 01:23 PM2019-01-14T13:23:55+5:302019-01-14T13:32:54+5:30

काँग्रेस-भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

Karnataka Bjp Attempting To Topple Congress Jds Alliance Government through operation lotus | कर्नाटकात पुन्हा सत्तेचं नाटक; 'ऑपरेशन लोटस'मुळे काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात

कर्नाटकात पुन्हा सत्तेचं नाटक; 'ऑपरेशन लोटस'मुळे काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात

बंगळुरु: कर्नाटकमधीलकाँग्रेस-जेडीएसची सत्ता उलथून टाकण्यासाठी भाजपानं जोर लावल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्यासाठी भाजपानं 17 जानेवारीपर्यंची डेडलाईन निश्चित केली आहे. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. तर काँग्रेसला स्वत:चे आमदार सांभळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून आमच्यावर आरोप केले जात असल्याचा पलटवार भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी केला आहे. 




काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्यासाठी भाजपा 'ऑपरेशन लोटस'वर काम करत असल्याचा गंभीर आरोप शिवकुमार यांनी केला. सत्ता उलथवण्यासाठी आमच्या तीन आमदारांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना पैशांचं आमिष दिलं जात आहे. त्या ठिकाणी भाजपाचेही काही आमदार आहेत. काँग्रेस आमदारांना किती रुपयांची ऑफर दिली जात आहे, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे, असा दावा त्यांनी केला. आमचे मुख्यमंत्री भाजपाच्या बाबतीत जरा जास्तच उदार असल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनाही लक्ष्य केलं. सर्व आमदारांनी त्यांना भाजपाच्या कटकारस्थानाची कल्पना देऊनही मुख्यमंत्र्यांनी काहीच केलं नाही, असं शिवकुमार म्हणाले. 




कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेस आणि जेडीएसचे एकूण 116 आमदार आहेत. तर भाजपाच्या आमदारांची संख्या 104 इतकी आहे. काँग्रेस-जेडीएसला दोन अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. यासोबतच बहुजन समाज पार्टीचा एक आमदारदेखील त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसचं संख्याबळ 119 वर जातं. मात्र अपक्ष आमदार आर. शंकर आणि बहुजन समाज पार्टीच्या एन. महेश यांची कॅबिनेटमधून गच्छंती करण्यात आल्यानं त्यांचे सत्ताधाऱ्यांसोबतचे संबंध ताणले गेले आहेत. 




विधानसभेतील आमदारांची संख्या 207 वर आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा परिस्थितीत बहुमताचा आकडा 104 होईल. भाजपाकडे सध्या इतकेच आमदार आहेत. मात्र यासाठी भाजपाला सत्तेत असलेल्या 16 आमदारांचे राजीनामे आवश्यक आहेत. दोन अपक्ष आणि एक बसपा आमदार यांची नाराजी भाजपाच्या पथ्यावर पडू शकते. मात्र इतक्या आमदारांच्या राजीनाम्यांबद्दल राजकीय विश्लेषक महादेव प्रकाश यांनी शंका व्यक्त केली. निवडणूक होऊन फक्त 7 महिने झाले आहेत. त्यामुळे इतके आमदार राजीनामे देतील, असं वाटत नसल्याचं प्रकाश म्हणाले. 

Web Title: Karnataka Bjp Attempting To Topple Congress Jds Alliance Government through operation lotus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.