कन्हैय्या-गिरिराज लढाई म्हणजे लेफ्ट विरुद्ध राईट; पण 'तिसरा' उमेदवार देऊ शकतो 'टफ फाईट'

By बाळकृष्ण परब | Published: April 15, 2019 06:14 PM2019-04-15T18:14:15+5:302019-04-15T18:15:50+5:30

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघातील लढती विशेष लक्ष वेधून घेत आहेत. त्यापैकी एक लढत आहे बिहारमधील बेगुसराय येथील. डाव्या पक्षांचा उमेदवार असलेल्या कन्हैय्या कुमार यांच्याविरोधात भाजपाने कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या गिरिराज सिंह यांना उतरवल्याने येथील मुकाबला लेफ्ट विरुद्ध राईट असा झाला आहे.

Kanhaiya-Giriraj battle means left Vs right; But third candidate can give 'fight' | कन्हैय्या-गिरिराज लढाई म्हणजे लेफ्ट विरुद्ध राईट; पण 'तिसरा' उमेदवार देऊ शकतो 'टफ फाईट'

कन्हैय्या-गिरिराज लढाई म्हणजे लेफ्ट विरुद्ध राईट; पण 'तिसरा' उमेदवार देऊ शकतो 'टफ फाईट'

Next

- बाळकृष्ण परब 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघातील लढती विशेष लक्ष वेधून घेत आहेत. त्यापैकी एक लढत आहे बिहारमधील बेगुसराय येथील. डाव्या पक्षांचा उमेदवार असलेल्या कन्हैय्या कुमार यांच्याविरोधात भाजपाने कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या गिरिराज सिंह यांना उतरवल्याने येथील मुकाबला लेफ्ट विरुद्ध राईट असा झाला आहे. त्यानिमित्ताने  गेल्या दोन चार वर्षांपासून जेएनयूपासून अनेक मंचांवर सुरू असलेली डाव्या आणि उजव्या विचारांची लढाई प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात पोहोचली आहे. मात्र बेगुसरायमध्ये केवळ डावे आणि उजवे अशी लढाई नाही तर त्या लढाईत तिसराही कोन आहे. तो कोन म्हणजे महागठबंधन. 

जेएनयूमध्ये कथित देशविरोधी घोषणांचे प्रकरण घडल्यानंतर डाव्या विद्यार्थी संघटनेचा नेता असलेल्या कन्हैया कुमारचे नाव देशपातळीवर पोहोचले. तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात कन्हैय्या कुमार यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून आवाज उठवल्याने अल्पावधीतच कन्हैय्या कुमार हे नाव मोदीविरोधी आवाजाचा चेहरा बनले. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदीविरोधी पक्ष कन्हैय्यांना एकजुटीने पाठिंबा देऊन उमेदवारी देतील, असे वाटत होते. मात्र दीर्घकाळ रंगलेल्या बिहारमधील महाआघाडीच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर कन्हैय्या कुमार यांना महाआघाडीकडून उमेदवारी मिळालीच नाही. उलट राजदने बेगुसरायमध्ये तन्वीर हसन यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे डाव्या पक्षांना कन्हैया कुमार यांना स्वतंत्रपणे उमेदवारी जाहीर करावी लागली. तर भाजपाने या मतदारसंघात प्रखर हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या गिरिराज सिंह यांना मैदानात उतरवून या लढतीला उजवे विरुद्ध डावे असे रूप दिले आहे.

कन्हैया कुमार विरुद्ध गिरिराज सिंह अशी लढत निश्चित झाल्यावर मीडिया आणि सोशल मीडियाचे लक्ष बेगुसरायकडे जाणे साहजिकच होते. मात्र कन्हैया विरुद्ध गिरिराज असे चित्र  रंगवताना महागठबंधनच्या उमेदवाराकडे माध्यमांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.  बिहारमधील स्थानिक प्रसारमाध्यमे आणि स्थानिक पत्रकारांच्या मतांचा आढावा घेतल्यास बेगुसरायमध्ये कन्हैय्या कुमार विरुद्ध गिरिराज सिंह अशी थेट लढत न होता ती गिरिराज सिंह विरुद्ध तन्वीर हसन विरुद्ध कन्हैय्या कुमार अशी होण्याची शक्यता आहे, असे दिसते. त्यातही एकेकाळी बेगुसरायची ओळख 'बिहारचे लेनिनग्राड' अशी असली तरी आज तिथला डाव्यांचा जनाधार कमी झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आणि राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांना आव्हान देताना कन्हैया कुमारला फार मेहनत घ्यावी लागणार आहे, असा निष्कर्ष बिहारमधील स्थानिक माध्यमांच्या वृत्तांमधून निघत आहे. त्यामुळे या लढतीबाबतचे अनेकांचे आडाखे चुकण्याची शक्यता आहे. 

बेगुसरायचा इतिहास पाहिल्यास येथे अपवाद वगळता बहुतांश वेळा भूमिहार जातीच्या उमेदवारांचीच सरशी झाली आहे. या मतदारसंघात डाव्या पक्षांचे वर्चस्व असल्याने या मतदारसंघाला बिहारचे लेनिनग्राड असे म्हटले जात असे. मात्र गेल्या काही वर्षांत देशपातळी बरोबरच बेगुसरायमध्येही डाव्यांचा जनाधार आक्रसत चालला आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात झालेल्या मतदानाचा आढावा घेतल्यास येथे डाव्या पक्षांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली होती. त्यावेळी भाजपाचे नेते भोला सिंह 4 लाख 28 हजार मतांसह विजयी झाले होते. राजदचे तन्वीर हसन 3 लाख 70 हजार मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले होते. तर तिसऱ्या स्थानी राहिलेले डाव्या पक्षांचे राजेंद्र प्रसाद सिंह यांना 1 लाख 92 हजार मते मिळाली होती.  एकंदरीत बेगुसरायमधील मतांची टक्केवारी आणि जातीय गणित पाहता या निवडणुकीत कुठल्याही उमेदवाराचे पारडे जड आहे असे छातीठोकपणे सांगता येणार नाही.

तसेच मीडियाने येथे गिरिराज सिंह विरुद्ध कन्हैय्या कुमार असे चित्र उभे केले असले तरी येथील महाआघाडीच्या उमेदवाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाआघाडीच्य तन्वीर हसन यांनी 2014 लोकसभा निडणुकीत ऐन मोदी लाटेतही तन्वीर हसन केवळ 58 हजार मतांनी पराभूत झाले होते. यावेळीही तन्वीर हसन संपूर्ण शक्तीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा जनाधारही मजबूत आहे. 

भूमिहार बहुल बेगुसरायमध्ये आमनेसामने आलेले गिरिराज सिंह  आणि कन्हैया कुमार हे दोघेही भूमिहार जातीचेच आहेत. त्यामुळे आता या जातीमधील मतदार कोणाच्या मागे उभा राहतो हे पाहावे लागेल. त्यातही भाजपा, महाआघाडी आणि डावे पक्ष यांचा जनाधार ठरलेला आहे.  त्यामुळे या पक्षांचे पारंपरिक मतदार सहजपणे दुसरीकडे वळणे कठीण आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास कन्हैया कुमार यांना नवे मतदार खेचून अडचणी येतील. तर भूमिहार मतदारांमध्ये फूट पडल्यास त्याचा फटका गिरिराज सिंह यांना बसू शकतो. तसे झाल्यास डावे विरुद्ध उजव्यांच्या लढाईत महाआघाडीच्या तन्वीर हसन यांचे पारडे जड ठरू शकते.   

बालाकोटमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकनंतर  निर्माण झालेल्या देशभक्तीच्या लाटेचा प्रभाव कायम राहिल्यास तसेच कन्हैया कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या देशद्रोहाच्या आरोपांची हवा झाल्यास गिरिराज सिंह यांना विजयाची संधी मिळेल. तसेच  गिरिराज सिंह विजयी झाल्यास ते हिंदुत्ववाद्यांसाठी फार मोठे यश आणि डाव्यांसाठी धक्कादायक ठरेल. 

सध्या बेगुसरायमधील कानाकोपरा पिंजून काढत असलेले कन्हैया कुमार आपण कुठल्याही जातीपातीचे राजकारण करणार नसल्याचे सांगत आहेत. त्यांना मिळत असलेला प्रतिसादही उत्तम आहे. मात्र डाव्या पक्षांना गेल्यावेळी मिळालेल्या 1 लाख 92 हजार मतांवरून हे मताधिक्य हमखास विजय मिळवून देणाऱ्या पाच सव्वा पाच लाखांपर्यंत पोहोचवताना कन्हैया कुमार आणि डाव्यांचा कस लागणार आहे. पण कन्हैय्या कुमार यांनी बेगुसरायच्या मैदानात शड्डू ठोकल्याने येथील निवडणूक रंगतदार झाली आहे हे नक्की.

Web Title: Kanhaiya-Giriraj battle means left Vs right; But third candidate can give 'fight'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.