'माफ करा, नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केलं', मोदींनीही आपली चूक मान्य करावी - कमल हासन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 03:46 PM2017-10-18T15:46:42+5:302017-10-18T15:50:04+5:30

नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केल्याबद्दल अभिनेता कमल हासनने लोकांची माफी मागितली आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय आपली चूक होती हे मान्य केल्यास आपण पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना सलाम करु असं म्हटलं आहे.

Kamal Haasan apologises for backing note ban | 'माफ करा, नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केलं', मोदींनीही आपली चूक मान्य करावी - कमल हासन

'माफ करा, नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केलं', मोदींनीही आपली चूक मान्य करावी - कमल हासन

Next

चेन्नई - नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केल्याबद्दल अभिनेता कमल हासनने लोकांची माफी मागितली आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय आपली चूक होती हे मान्य केल्यास आपण पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना सलाम करु असं म्हटलं आहे. एका तामिळ मॅगझीनमध्ये लिहिलेल्या लेखात कमल हासन यांनी सांगितलं आहे की, 'आपली चूक मान्य करणे आणि ती सुधारणे हे महान लोकांचं लक्षण आहे, जे महात्मा गांधी यांना जमायचं'. 

नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर कमल हासन यांनी निर्णयाला जाहीर पाठिंबा दिला होता. कमल हासन यांनी ट्विट करत निर्णयाचं स्वागत करताना, पक्षापुरता विचार न करता पाठिंबा दिला पाहिजे असं आवाहन केलं होतं. 'काळा पैसा नष्ट करण्यासाठी लोकांनी थोडा त्रास सहन करायला हवा असं मला वाटलं होतं', असं कमल हासन यांनी लिहिलं आहे. 

नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन केल्यानंतर माझे काही मित्र ज्यांना अर्थव्यवस्थेचं ज्ञान होतं, त्यांनी फोन करुन टीका केली होती असं कमल हासन यांनी सांगितलं आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की नोटाबंदीचा निर्णय योग्य होता, पण तो ज्या पद्दतीने लागू करण्यात आला ती पद्दत चुकीची होती असंही कमल हासन यांनी सांगितलं आहे.  

कमल हासन यांनी पुढे लिहिलं आहे की, 'नोटाबंदीचा निर्णय फसवणूक असल्याचे आवाज आता उठत आहेत, आणि सरकारकडून न येणारा प्रतिसाद पाहता या निर्णयावर शंका उपस्थित होत आहे'.

गरज पडली तर भाजपाचं 'कमळ' देखील हाती घेईन - कमल हासन
कमल हासन यांनी गरज पडली तर भाजपाशीही हातमिळवणी करण्यासाठी आपण तयार असल्याचं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. लोकांचं भलं होणार असेल तर आपण कोणतीही सीमा गाठण्यासाठी तयार आहोत, मग भाजपाशी हातमिळवणी करायची असो किंवा चित्रपटसृष्टी सोडायची असो असं कमल हासन बोलले होते. 

भाजपासोबत जाण्यासंबंधी विचारलं असता कमल हासन यांनी सांगितलं की, 'जर माझ्या विचारांमध्ये अडथळा येणार नसेल, आणि प्रशासनाशी संबंधित असेल तर नक्कीच. कुठेतरी तुम्हाला राज्याच्या भल्याचा विचार करावा लागतो. त्यांना माझी विचारधारा योग्य वाटते की नाही हे मला माहित नाही. राजकारणात जर लोकांचं भलं होणार असेल तर अस्पृश्य असं काही नसतं'.
 

Web Title: Kamal Haasan apologises for backing note ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.