अखेर जस्टीन ट्रुडो- नरेंद्र मोदी भेट, विविध मुद्द्यांवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 02:42 PM2018-02-23T14:42:36+5:302018-02-23T14:49:47+5:30

Justin Trudeau meets Narendra Modi In delhi | अखेर जस्टीन ट्रुडो- नरेंद्र मोदी भेट, विविध मुद्द्यांवर चर्चा

अखेर जस्टीन ट्रुडो- नरेंद्र मोदी भेट, विविध मुद्द्यांवर चर्चा

Next

नवी दिल्ली- आठवड्याभराच्या दौऱ्यासाठी भारतात आलेल्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. अहमदाबाद. मथुरा, आग्रा, मुंबई, अमृतसर असे भारतातील विविध शहरांमध्ये भ्रमण झाल्यानंतर जस्टीन ट्रुडो यांचे राजधानी नवी दिल्लीमध्ये पुन्हा आगमन झाले त्यानंतर त्यांच्या दौऱ्याच्या सहाव्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली. त्याबरोबरच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. दोन्ही देशांनी विविध विषयांवर केलेल्या सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही केल्या.



खलिस्तान समर्थक मंत्र्यांना दौऱ्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर जस्टीन ट्रुडो यांचा भारत दौरा विविध शंका आणि टिकेने झाकोळून गेला. त्याचप्रमाणे खलिस्तानवादी दहशतवादी जसपाल अटवाल याने त्यांच्या कार्यक्रमांमध्ये घुसखोरी करुन स्थान मिळवल्यानंतर त्यांच्यावरील टीका अधिकच तीव्र होऊ लागली. अटवालचे जस्टीन ट्रुडो यांच्या पत्नीबरोबर मुंबईतील कार्यालयात काढलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले त्याचप्रमाणे कॅनडाच्या भारतातील राजदुतांनी त्याला स्नेहभोजनाचे निमंत्रण दिल्याचेही उघड झाले यामुळे भारतीय माध्यमांमध्ये या दौऱ्याची अधिकच चर्चा होऊ लागली.



 

 पंजाबी नेत्यांनी विशेषत: मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करुनही अशा चुका ट्रुडो यांच्या दौऱ्यात होत राहिल्या. त्यामुळे या दौऱ्यात गुंतवणूक, उद्योग, व्यवसाय, संरक्षण अशा महत्त्वाच्या विषयांवर कितपत मंथन झाले व त्यातून काय निष्पन्न झाले हे कोडेच असेल. या दौऱ्यामुळे भाजपा आणि काँग्रेस मात्र एका मुद्द्यावर तरी एकत्र आल्याचे दिसून आले. खलिस्तानला खतपाणी मिळत असेल तर ते आजिबात खपवून घेतले जाणार नाही असा कडक संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅ. अमरिंदर सिंग यांच्या वर्तनातून गेला आहे.



तिकडे कॅनेडियन माध्यमांनीही आपल्या पंतप्रधानांच्या दौऱ्यात काहीच ठोस कार्यक्रम दिसत नसल्याची ओरड सुरु केली. ज्या गुंतवणूक आणि व्यापाऱ्याच्या आशेने पंतप्रधान ट्रुडो भारतात गेले त्याबाबत काहीच होत नसल्याने पंतप्रधान सहकुटुंब केवळ पर्यटनासाठी गेले आहेत अशा शब्दांमध्ये टीका केली आहे. अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रुडो यांचे स्वागत केले. ट्रुडो यांच्या कुटुंबाने भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजघाट येथील समाधीलाही भेट दिली. 




 

Web Title: Justin Trudeau meets Narendra Modi In delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.