नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची १० जनपथ या निवासस्थानी भेट घेताना राजशिष्टाचार बाजूला सारल्यामुळे रालोआ सरकारला जबर झटका बसला आहे. सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या किंवा सभागृहात पक्षाच्या नेत्या नसतानाही ते १० जनपथला पोहोचले.
आफ्रिकन राष्ट्रांच्या शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचा उल्लेख करण्याचे टाळले असले तरी आफ्रिकी देशांच्या प्रमुखांनी भारतासोबतच्या सुदृढ संबंधात नेहरूंच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला आहे. याउलट रालोआ सरकारने नेहरूंचे महत्त्व डावलत अन्य नेत्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला.
झुमा यांनी अशा वातावरणात सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी १० जनपथला जाण्याची इच्छा व्यक्त करीत विदेश मंत्रालयाला तशी माहिती देताच सरकारला बुचकळ्यात टाकले. (लोकमत न्यूज नेटवर्क)