2014 च्या धुंदीतून बाहेर पडा, ही 2019 ची निवडणूक आहे; जदयूचा भाजपाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:11 PM2018-06-22T16:11:25+5:302018-06-22T16:11:25+5:30

आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 2020 मध्ये होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आत्ताच निश्चित केला जावा.

JDU message to ally BJP One has to remember that 2019 is not 2014 | 2014 च्या धुंदीतून बाहेर पडा, ही 2019 ची निवडणूक आहे; जदयूचा भाजपाला इशारा

2014 च्या धुंदीतून बाहेर पडा, ही 2019 ची निवडणूक आहे; जदयूचा भाजपाला इशारा

Next

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून बिहारमध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दल (जदयू) यांच्यातील कुरबुरी वाढल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 2020 मध्ये होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आत्ताच निश्चित केला जावा, यासाठी जदयू भाजपाच्या हात धुवून मागे लागला आहे. मात्र, भाजपा यासाठी फार उत्सुक नसल्याचे चित्र आहे.

जदयूच्या नेत्यांना जागावाटपाच्या अपेक्षांविषयी विचारले असता त्यांनी म्हटले की, रालोआतील सर्व घटकपक्षांनी एकत्र बसून याचा निर्णय घ्यायला हवा. सद्यपरिस्थितीचा विचार करून प्रत्येक पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या पाहिजेत, असे जदयूच्या नेत्यांनी म्हटले. मात्र, भाजपाला पुन्हा एकदा 2014 सारखे यश मिळवायचे असल्याने जागावाटपात त्यांच्या जास्त अपेक्षा असतील, याकडे प्रसारमाध्यमांनी जदयूच्या नेत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जदयूच्या नेत्यांनी म्हटले की, ही 2014 नव्हे तर 2019 ची निवडणूक आहे, हे आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल पाहता जनमतात बदल झाल्याचेही दिसत आहे. तसेच 2014 चे निकष लावायचे झाल्यास भाजपाने बिहारमध्ये 40 पैकी 31 जागांवर विजय मिळवला होता. या जागांचा विचार करता भाजपाला विधानसभेच्या  243 पैकी 173 जागांवर यश मिळू शकले असते. तर त्यावेळी जदयूला केवळ दोनच जागा जिंकता आल्या होत्या. रामविलास पासवान आणि उपेंद्र सिंह कुशवाह यांच्या पक्षालाही अनुक्रमे सहा आणि तीन जागा मिळाल्या होत्या. मग आता आगामी निवडणुकीत एवढ्याचा जागा लढवायच्या का, असा सवालही जदयूच्या नेत्यांनी विचारला. या पार्श्वभूमीवर आता भाजपा आपल्या मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी काय पाऊल उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
 

Web Title: JDU message to ally BJP One has to remember that 2019 is not 2014

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.