जम्मू वेगळे ते वेगळेच आहे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:05 AM2019-06-26T00:05:26+5:302019-06-26T00:06:34+5:30

पर्यटन हा नक्कीच चांगला व्यवसाय आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रोजगाराच्या सर्वात जास्त संधी पर्यटन या क्षेत्राने उपलब्ध करून दिल्या तर ते नवल नसेल. पण हे क्षेत्र व्यावसायिक, पर्यटक, सरकार, सुविधा या सगळ्यांकडूनच एक संवेदनशीलता गृहीत धरते. हे अर्थकारण राजकारण आणि समाजकारण यावर अवलंबून असते.

Jammu is different | जम्मू वेगळे ते वेगळेच आहे 

जम्मू वेगळे ते वेगळेच आहे 

Next

- चन्द्रशेखर टिळक

फिस टूरनिमित्त दोन-तीन दिवस जम्मूत होतो. मला खूप उत्सुकता होती. मी जम्मूला पहिल्यांदाच जात होतो. दुसरे म्हणजे काश्मीर आणि कलम ३७० हे माझे अगदी अभ्यासाचे म्हणता आले नाहीत तरी कुतुहलाचे विषय नक्कीच आहेत. आणि असे संवेदनशील विषय पुस्तके- वर्तमानपत्रे- नियतकालिके- व्याख्याने- परिसंवाद- प्रसारमाध्यमातल्या चर्चा यातून माहिती जरूर होतात ; पण पुरेसे समजत नाहीत. तिसरे म्हणजे याआधी तीनदा ठरवूनही मी जाऊ शकलो नव्हतो. पण यावेळी जमलं. जम्मू वेगळेच आहे...

टूरवर निघायच्या आदल्या दिवशीच जम्मूत ठरवलेल्या कारवाल्याचा फोन आला होता. आणि तो फोनवर मी नक्की येणार आहे ना असं विचारत होता. माझ्या होकारार्थी उत्तरावर तो मला कार नंबर वगैरे तपशील लिहून घ्यायला सांगत होता. ते तपशील तो व्हाटसअ‍ॅपवर पाठवायला तयार नव्हता.
नंतर थोड्या वेळाने नेहमीप्रमाणेच आमच्या आॅफिसने मला हे सगळे तपशील पाठवले. सवयीने हे दोन्ही तपशील तपासत असताना माझ्या लक्षात आले की, या दोन तपशीलसंचात कार नंबर आणि फोन नंबर एक असले तरी आॅफिसने सांगितलेले ड्रायव्हरचे नाव आणि फोनवर त्या माणसाने सांगितलेले ड्रायव्हरचे नाव वेगळे आहे. माझा अ‍ॅण्टिना चालायला लागला...मनात आले ‘ये कश्मीर है...’

फोनवर कारवाल्याने सांगितले होते की विमानतळावर त्याच्या दाराशीच गाडी घेऊन त्याला येता येणार नाही. कारण पोलीस तिथे थांबू देत नाहीत. याच कारण जम्मू विमानतळावर बाहेर पडताना लक्षात आले. त्या विमानतळाचे ‘निर्गमन-द्वार’( एक्झिट गेट) एकदम भर रस्त्यावर आहे. इतके मुख्य रस्त्यावर दार असणारं दुसर ंविमानतळ आपल्या देशात कोणतच नाही. माझ्या पाहण्यात तरी नाहीच. त्यामुळे सुरक्षा अधिकाºयाइतकेच वाहतूक पोलिसही तिथे वाहने थांबू देत नाहीत आणि ते योग्यच आहे. जम्मू वेगळेच आहे...

मुंबई विमानतळावर असताना त्या ड्रायव्हरचा पुन्हा फोन आला. विमान वेळेवर आहे ना तो चौकशी करत होता. आवाज आदल्या दिवशी बोलणाºयाचाच वाटल्याने मी पुन्हा त्याचे नाव विचारले. आदल्या दिवशी सांगितले होते तेच नाव सांगितले. मी त्याला आॅफिसने मला दुसरे नाव सांगितले आहे असे म्हटले. त्यावर दोन्ही नावे त्याचीच आहेत असे सांगितले. एका नावाने त्याला हाक मारतात आणि दुसरे त्याचे कागदोपत्री नाव होते. मी जम्मू विमानतळावर कारशी पोहचल्यावर त्याने न मागता आपली ओळखपत्रे मला दाखवली. जम्मू वेगळेच आहे...

ड्रायव्हरने विमान वेळेवर आहे ना असं का विचारलं, अस मी त्याला हॉटेलला जाताना विचारले. तेव्हा रस्त्यावर कुठेही सावली नाही. झाडे तोडली. त्यामुळे गाड्या रस्त्यावर उन्हातच उभ्या कराव्या लागतात. त्या तापतात आणि इथल्या उन्हाळ्यात लवकर थंड होत नाहीत. त्याचा प्रवाशांना त्रास होतो हे त्याने जेंव्हा सांगितले, तेव्हा इतकेच मनात आले की मी इतका फिरतो किंवा फिरलो पण ही ‘मेहमान नवाझी’ काही औरच. जम्मू वेगळेच आहे...

जम्मूला जाताना विमान उतरायची वेळ जवळ आली आहे अशी घोषणा झाली. त्यानंतर थोड्याच वेळाने विमानाच्या खिडक्यांचे पडदे लावून घेण्याची सूचना वैमानिकांनी प्रवाशांना दिली. नंतर लगेचच प्रमुख हवाई सुंदरीने तीच सूचना पुन्हा दिली. त्यानुसार सर्वच खिडक्यांचे पडदे बंद आहेत याची विमानातल्या हवाई सुंदरींनी जातीने खातरजमा करून घेतली. अशा बंदोबस्तात विमान जम्मू विमानतळावर उतरले. तसं ते उतरल्या उतरल्या पुन्हा वैमानिकांनी खिडक्यांचे पडदे बंदच ठेवण्याची सूचना दिली. ‘जम्मू विमानतळ डिफेन्स एअरपोर्ट आहे’ याचीही आठवण करून देण्यात आली. मात्र अशा स्थितीत विमान धावपट्टीवर तब्बल अठरा मिनिटे उभे होते. कारण पार्र्किंग बे उपलब्ध नव्हता किंवा तिथे पोहोचण्याचा मार्ग मोकळा नव्हता. सहजच मनात आलं की जम्मू - काश्मीरची सर्वच अर्थाने संवेदनशीलता लक्षात घेता हे परवडणारे आहे का? जम्मू वेगळेच आहे... असाच काहीसा प्रकार परतीच्या प्रवासाच्या वेळी.

चेक इन करतानाच हॉटेलवाल्यांनी सांगितले होते की, जम्मूमध्ये विमानतळ परिसरात शिरल्यापासून विमानात बसेपर्यंत तीनवेळा बॅग चेक करतात. अगदी केबिन लगेज असले तरीसुद्धा. तसेच जम्मूहून परत येताना वेब चेक इन करता आले तरी बोर्डिंग पास मात्र विमानतळावरच मिळतो. त्यामुळे किमान अडीच-तीन तास तरी आधी निघा. तसे निघालोही. पण विमानतळाचे दरवाजेच उघडलेले नव्हते. हे दार मुख्य रस्त्यावर नाही इतकेच !
मला पडलेला प्रश्न असा आहे की, अशा संवेदनशील विमानतळावर लवकरात लवकर प्रवासी सेक्युरिटि- होल्ड एरियात नेणे जास्त श्रेयस्कर नाही का ? अशावेळी कै. मनोहर पर्रीकर आपले संरक्षणमंत्री असताना त्यांनी नागरी वाहतुकीसाठीही जे लष्करी विमानतळ वापरले जातात, त्याबद्दल उचललेल्या पावलांची मला त्या तीन दिवसात वारंवार आठवण होत होती. त्याचे विभाजन करण्याच्या दृष्टीने चंदीगढसारखा महत्त्वाचा विमानतळ त्यांनी वाहतुकीसाठी काही दिवस बंद ठेवायला लावला होता. भौगोलिक संवेदनशीलता आणि आपणा नागरिकांची असंवेदनशीलता लक्षात घेता ते अपरिहार्यच आहे. जम्मू वेगळेच आहे...

मी जम्मूला जायचा मुहूर्तही एकदम भारी शोधला होता. मी जम्मूला पोहोचलो त्याच दिवशी सकाळी कथुआ प्रकरणात कोर्टाचा निकाल आला होता. त्यामुळे वातावरण तंग व्हायला सुरुवात झाली होती. शिवाय त्याचदिवशी भल्या सकाळी सीमारेषेवर आपला एक जवान शहीद झाला होता. त्यावरून जम्मू विमानतळावर आमचं विमान अठरा मिनिटे का उभे होते याचा अंदाज... जम्मू वेगळेच आहे.

कारमध्ये बसल्या बसल्या त्या मुस्लिम ड्रायव्हरने त्या दिवशीचा माझा काय कार्यक्रम आहे असं विचारले? शक्य असेल तर जम्मू शहराबाहेर त्यादिवशी मी जाऊ नाही आणि रात्री फार उशीरा हॉटेलबाहेर फिरू नये हे आपणहून सांगितले. परत जाणवले, जम्मू वेगळेच आहे...

त्या ड्रायव्हरने असंही आपणहून सांगितले की जम्मू हे देवळांचे शहर आहे. त्यामुळे तिथे देशभरातील अनेकजण दर्शनासाठी येतात. त्यात वयस्कर मंडळी जास्त असतात. अख्खे कुटुंबही अनेकदा असते. हे सांगून तो पुढे म्हणाला ‘सगळ्याच देवळात मंगळवारी खूप गर्दी असते. त्यामुळे चालत असेल तर मंगळवार सोडून देवळात जाऊया’, ‘हम मंदिर जायेंगे...’ हे त्याचे शब्द... तो देवळात आला नाही. पण मी देवळात जावे याबद्दल मात्र तो आग्रही होता. श्रीनगरमध्ये याच्या अगदी विरुद्ध अनुभव आला होता. मनात आले, जम्मू वेगळेच आहे...

जम्मूत वेगवेगळ्या देवळांत जाताना एक वेगळीच गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे बाकीच्या शहरातील आपल्या देवळांच्या बाहेर असतात तशी पूजा साहित्याची दुकाने इथेही आहेत. खाद्यपदार्थ, शीतपेये यांचीही भरपूर दुकाने आहेत. त्याचबरोबर एक वेगळेपणही आहे. ते म्हणजे इथल्या अनेक देवळांबाहेर बंदी नोट घेऊन सुटी नाणी देणारी अनेक मंडळी बसलेली असतात. हा व्यवसाय तिथे लहान मुलेही करतात आणि म्हातारी माणसेही. हिंदू साधूही आणि मुस्लिम फकीरही. जम्मू वेगळेच आहे...

जम्मूतल्या त्या तीन दिवसांत प्रचंड उन्हाळा अनुभवला. दिवसभरातल्या वेगवेगळ्या मीटिंग करून परत आल्यावर घामाने ओलचिंब झालेला शर्ट अनुभवला. त्याच संध्याकाळी तासभर नुसता तुफान वारा झेलला आणि मग धुवाँधार पाऊस...हे सगळे एकाच दिवसात. जम्मू वेगळेच आहे...
अशाच एका मीटिंगमधून बाहेर पडलो. ड्रायव्हर कुठे आहे ते बघत होतो. कारण नेटवर्क असून नसल्यात जमा होते. तोच ड्रायव्हर मागून आला. मी ओळखलेच नाही त्याला. कारण त्यांनी स्वत:चा चेहरा पूर्ण झाकून घेतला होता. माझी प्रतिक्रिया पाहून तो हसून म्हणाला ‘असं राहणारे सगळेच दहशतवादी नसतात. अनेकदा ती वातावरणाची गरज असते आणि अलीकडे दहशतवादी मुद्दाम असं टाळतात.’ खरं आहे त्याचं म्हणणं. कुठला दहशतवादी असा... असो जम्मू वेगळेच आहे...

(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.) 

Web Title: Jammu is different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.