तो पवित्र अस्थिकलश होता माझ्या हाती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 04:09 AM2017-11-19T04:09:40+5:302017-11-19T07:14:34+5:30

देशाच्या कानाकोप-यात स्व. इंदिराजींच्या अस्थींचे कलश पाठवण्याची लगबग सुरू झाली. प्रत्येक राज्यासाठी एक असे २८ कलश तयार करण्यात आले. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी हा कलश मुंबईपर्यंत सुखरूप नेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती.

It was a sacred osteoporosis in my hands ... | तो पवित्र अस्थिकलश होता माझ्या हाती...

तो पवित्र अस्थिकलश होता माझ्या हाती...

Next

- सुशीलकुमार शिंदे
(माजी केंद्रीय गृहमंत्री)

- देशाच्या कानाकोप-यात स्व. इंदिराजींच्या अस्थींचे कलश पाठवण्याची लगबग सुरू झाली. प्रत्येक राज्यासाठी एक असे २८ कलश तयार करण्यात आले. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी हा कलश मुंबईपर्यंत सुखरूप नेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाने दोन तासांचा प्रवास करीत तो पवित्र कलश मी माझ्या मांडीवर घेऊन बसलो होतो. विचारांचे कल्लोळ मनात घोळत होते. आठवणींनी काहूर माजले होते.

इंदिराजींच्या हत्येने दिल्ली शहर थिजले होते़ रस्ते सुन्न दिसत होते. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना आपोआप डोळ्यांतून आसवे गळत राहिली़ तो अचेतन देह पाहून हीच का ती महिषासुरमर्दिनी, असा प्रश्न मनात आला़ त्यांच्या पार्थिवाला अग्नी देईपर्यंत मी अक्षरश: सुन्न होतो़

मी काँग्रेस फोरम फॉर सोशालिस्ट अ‍ॅक्शनमध्ये निमंत्रक म्हणून काम करू लागलो़ १९७२ मध्ये महाराष्ट्रातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगावची निवड केली़ दुष्काळी कामे सुरू होती़ अन्नाविना मजुरांचे हाल होत होते़ सुकडीवर गुजराण करावी लागत होती़ इंदिराजी आचेगावला आल्या़ सोबत मुख्यमंत्री वसंतराव नाईक, पालकमंत्री शरद पवार आणि आमदार वि़ गु़ शिवदारेआण्णा होते़ कार्यकर्ता म्हणून मीही होतो़
रोजगार हमीची कामे कशी सुरू आहेत? शेतमजुरांना, शेतकºयांना काम मिळत आहे का? मदत मिळत आहे काय? आदींची इंदिराजींनी माहिती घेतली. मजुरांशी बोलल्या़ मुख्यमंत्री व प्रशासनाला सूचना दिल्या़ दुष्काळाचे संकट सर्वांनी मिळून दूर सारूया, असे आवाहन इंदिराजींनी जाहीर सभेत केले़ इंदिराजींबरोबर आमचा फोटो काढण्यात आला़ तो फोटो आजही मी कौतुकाने सर्वांना दाखवतो़
मी विद्यार्थी असताना पंडित नेहरूंना जाहीर सभेत पाहिले होते़ नेहरू घराण्याचे आकर्षण होते़ इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाने मला भारावून टाकले होते. राजकारणात येण्यापूर्वी कधी इंदिराजींची भेट होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते़ राजकारणात आल्यानंतर अनेकदा मी त्यांना भेटू शकलो़ महत्त्वाच्या विषयांवर चर्चाही केली़
हरिजन, मागासवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी सूतगिरण्या काढण्यात आल्या़ महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव केंद्रातल्या नियोजन आयोगाचे तत्कालीन प्रमुख प्रणव मुखर्जी यांनी मान्य केला़ प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगण्यासाठी इंदिराजींची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात गेलो तेव्हा इंदिराजींचा मूड काहीसा वेगळा होता़ त्या पांढºया कागदावर चित्र काढण्यात मग्न होत्या़ आम्ही ते पाहत होतो आणि मनातल्या मनात मी मात्र महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र रंगवत होतो़
इंदिराजींनी माझ्याकडे कटाक्ष टाकला़ त्या म्हणाल्या, ‘महाराष्ट्र में क्या चल रहा है?’ मी म्हणालो, सबकुछ ठीक है़ थोडा वेळ तसाच बसून राहिलो़ थोड्या वेळानंतर उठायला लागलो तेव्हा त्यांनी मला विचारलं, कई लोगोंने मुझे बताया है की, आप शरद पवार के बारे में कभी टीकाटिप्पणी नहीं करते़ त्यांचा सूर आणि रोख काही वेगळाच होता़
अनपेक्षित व मार्मिक प्रश्नाने मी सावध झालो़ शांतपणे त्यांना म्हटलं, ‘मॅडमजी, ये बात सही है, मैं पवार साहबपर कभी टिप्पणी नहीं करता़ क्योंकि मैं पुलीस अफसर था तब शरद पवारने मुझे राजनीतीमें लाया़ चुनाव लडने के लिये मुझे पैसे भी दिये़ मॅडम मेरा स्वभाव है, किसीने मुझे मदद की तो मैं उनके एहसान कभी भूलता नहीं़ तो उनके उपर टीकाटिप्पणी कैसे करुँ ? मेरी जबान नहीं उठती़ लेकिन आज आपने बताया तो मैं कलसे ही पवार के बारे में टीकाटिप्पणी करुँ गा़’
त्यावर इंदिराजी म्हणाल्या, यहाँ जो भी आते हैं वो लोग शरद पवार को बुरा कहते हैं और बाहर जाकर उनसे हाथ मिलाते हैं़ शिंदेजी, तुमने मुझे सही बताया. ठीक हैं, असे म्हणत त्यांनी बेल मारली़ त्यांचे स्वीय सहायक आऱ के.धवन आत आले़ इंदिराजींनी सांगितले, शिंदे जब भी कभी आयेंगे तो मुझे मिलवाना, ओके!
३१ आॅक्टोबर १९८४ रोजी १, सफदरजंग रोडवरील निवासस्थानी इंदिरा गांधी यांचा सुरक्षारक्षकांनी बेछूट गोळीबाराने वेध घेतला़ ही बातमी मुंबईत धडकली़ त्या वेळी मी मंत्रालयात फायलींचा निपटारा करीत होतो़ मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी माझ्यावर अर्थखात्याची जबाबदारी दिली होती़ इंदिराजींच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधानांच्या निवासस्थानी फोन लावला़ तेव्हा तेथील आॅपरेटर ढसाढसा रडत होती़ मी समजून घेतले़ वसंतदादांना ही वाईट बातमी त्वरेने कळवली़ तातडीने विशेष विमानाने दिल्ली गाठली़
इंदिराजींच्या हत्येने दिल्ली शहर थिजले होते़ रस्ते सुन्न दिसत होते़ त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना आपोआप डोळ्यांतून आसवे गळत राहिली़ तो अचेतन देह पाहून हीच का ती महिषासुरमर्दिनी? असा प्रश्न मनात आला़ त्यांच्या पार्थिवाला अग्नी देईपर्यंत मी अक्षरश: सुन्न होतो़
देशाच्या कानाकोपºयात इंदिराजींच्या अस्थींचे कलश पाठवण्याची लगबग सुरू झाली़ प्रत्येक राज्यासाठी एक याप्रमाणे २८ कलश तयार करण्यात आले़ महाराष्ट्रातून मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, मी आणि इतर नेतेमंडळी हजर होतो़ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा कलश कोणाच्या हाती देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष होते़ वातावरणात निरव शांतता होती़ वसंतदादा पुढे आले नि म्हणाले, सुशीलकुमार व्हा पुढे, तो महाराष्ट्राचा कलश तुमच्या हाती घ्या़ मुंबईपर्यंत तो सुखरूप नेण्याची जबाबदारी तुमच्यावर!
वसंतदादांची आज्ञा ऐकताच मी तर गांगरूनच गेलो़ इंडियन एअर लाइन्स विमानाने दोन तासांचा प्रवास करीत तो पवित्र कलश मी माझ्या मांडीवर घेऊन बसलो होतो़ विचारांचे कल्लोळ मनात घोळत होते़ आठवणींनी काहूर माजले होते. हिमालयाची उंची लाभलेल्या माझ्या नेत्या इंदिराजींच्या कर्तबगारीच्या अनेक आठवणी भराभर तरळून जात होत्या.

(शब्दांकन : नारायण चव्हाण)

Web Title: It was a sacred osteoporosis in my hands ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.