ishrat jahan who filed petition against three divorce was included in bjp | ट्रिपल तलाकविरोधात लढा देणा-या इशरत जहाँ यांचा भाजपाप्रवेश

नवी दिल्ली - ट्रिपल तलाकविरोधात याचिका दाखल करणा-यांपैकी एक असलेल्या इशरत जहाँ यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ट्रिपल तलाक ही प्रथा बेकायदेशीर आणि मुस्लिम महिलांसाठी सन्मानाने जगण्याच्या अधिकाराची गळचेपी असल्याचे सांगत पश्चिम बंगालमधील हावडा येथील इशरत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 'एनडी टीव्ही'च्यावृत्तानुसार, इशरत जहाँ हावडा येथील कार्यालयात येऊन भाजपामध्ये सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती भाजपाचे पश्चिम बंगालमधील सरचिटणीस सायंतन बस यांनी दिली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या हावडा येथील शाखेने शनिवारी इशरत जहाँ यांना सन्मानित करुन पक्षात प्रवेश दिला. बसू पुढे असेही म्हणाले की, इशरत यांचा सन्मान करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

कोण आहेत इशरत जहाँ?
तिहेरी तलाक विरोधात कोर्टात जाणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगालच्या हावडामधील इशरत जहाँ यांचाही समावेश आहे. इशरत यांच्या पतीने दुबईतून फोनवरून त्यांना तलाक दिला होता. इशरत जहाँ यांना लग्नानंतर 15 वर्षांनी पतीने तिहेरी तलाक दिला. त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं, 2001 मध्ये त्यांचं लग्न झालं असून त्यांना मुलं आहेत. त्या मुलांना त्यांच्या पतीने जबरदस्तीने त्यांच्याकडे ठेवलं आहे. आपली मुलं परत मिळावी तसंच पोलीस सुरक्षा मिळावी, अशी मागणी इशरत यांनी याचिकेत केली. तिहेरी तलाक बेकायदेशीर असून मुस्लिम महिलांच्या अधिकाराची गळचेपी असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं.

तिहेरी तलाक विरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच प्रमुख महिलांमध्ये इशरत जहाँ यांच्यासह शायरा बानो, आफरीन रहमान, अतिया साबरी, गुलशन परवीन यांचा समावेश आहे.