श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू असून, राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचा एक जवान शहीद झाला. नायक मुद्दसर अहमद शहीद झाले असून, दुसरीकडे बालाकोट सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात एक नऊ वर्षांची मुलगी ठार झाली.
नायक मुद्दसर अहमद हे काश्मीरचे असून, त्यांच्यामागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. अतिशय प्रामाणिक जवान आम्ही गमावला आहे, असे लष्कराने म्हटले. पाकच्या गोळीबारात मरण पावलेली सजदा हौसर ही अवघ्या नऊ वर्षांची मुलगी बारोटी गावची आहे. याशिवाय तेथील दोन रहिवासी जखमी झाले आहेत. (वृत्तसंस्था)

आमचे सैनिक बुडाले; पाकचा दावा
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) नियंत्रण रेषेजवळ रेकी करत असलेल्या एका वाहनावर भारतीय सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. त्यामुळे ते वाहन नदीत बुडाले. त्यामध्ये आमचे ४ सैनिक होते असे पाकिस्तानने म्हटले आहे. पीओकेच्या मुजफ्फराबादपासून ७३ किलोमीटर दूर नीलम नदीजवळ असलेल्या एका वाहनावर भारतीय जवानांनी गोळीबार केला . त्यामुळे चार सैनिक नदीत बुडाले असं पाकिस्तानी सेनेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून, तिघांचा शोध सुरू आहे.

डीजीएमओमधील चर्चेनंतरही पाकने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
दोन्ही देशांमध्ये झालेल्या डीजीएमओ स्तराच्या चर्चेमध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या गोळीबारात आपले चार सैनिक ठार झाल्याचा दावा केला. त्याचवेळी भारताने पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे सांगितले. पाकच्या कुठल्याही हल्ल्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल, असे भारताने बजावले आहे.
महत्त्वाचे पाकच्या विनंतीवरुन दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाल्यानंतरही पाकिस्तानने अशा प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. काश्मीरच्या
पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गेल्या
दोन दिवासांपासून गोळीबार सुरू आहे. प्रत्युत्तरात भारतीय सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये पाकिस्तानच्या
चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे.