पंतप्रधान मोदींसाठी वादग्रस्त 'टाइम'लाईन; कव्हर पेज फोटोवरून गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 11:01 AM2019-05-10T11:01:55+5:302019-05-10T11:04:27+5:30

विशेष लेखातून 'टाइम' मासिकाची मोदींवर जोरदार टीका

India's Divider in Chief PM Modi On Time Magazine Cover With Controversial Headline | पंतप्रधान मोदींसाठी वादग्रस्त 'टाइम'लाईन; कव्हर पेज फोटोवरून गदारोळ

पंतप्रधान मोदींसाठी वादग्रस्त 'टाइम'लाईन; कव्हर पेज फोटोवरून गदारोळ

Next

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय मासिक 'टाइम'नं पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिलं आहे. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ' म्हणजेच 'भारताला तोडणारा प्रमुख' असा करण्यात आला आहे. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. टाइम मासिकानं आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यामधून मोदींच्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेण्यात आला आहे. 'देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?' या शीर्षकाखाली टाइमनं हा लेख प्रसिद्ध केला आहे. 

पंतप्रधान मोदींच्या कारभारावर कडवी टीका करताना मासिकानं नेहरुंचा समाजवाद आणि भारतातली सध्याची सामाजिक परिस्थिती यांची तुलना केली आहे. हिंदू आणि मुस्लिमांमधला बंधूभाव वाढावा यासाठी मोदींनी काहीच केलं नाही, अशी टीका लेखातून करण्यात आली आहे. आतिश तासीर यांनी हा लेख लिहिला आहे. 'नरेंद्र मोदींनी महान राजकीय व्यक्तीमत्त्वांवर हल्ले चढवले. ते काँग्रेसमुक्त भारताबद्दल बोलतात. त्यांनी कधीही हिंदू-मुस्लिमांचं नातं सुधारावं यासाठी प्रयत्न केले नाहीत. तशी इच्छाशक्ती दाखवली नाही,' अशा शब्दांमध्ये टाइमनं मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. 

मोदींवरील लेखातून भारतीय संस्कृतीवरदेखील भाष्य करण्यात आलं आहे. 'भारताच्या कथित उदार संस्कृतीची चर्चा केली जाते. मात्र मोदींचं सत्तेत येणं या संस्कृतीत धार्मिक राष्ट्रवाद, मुस्लिमांविरोधातली भावना आणि जातीय कट्टरता किती मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे ते दाखवतं,' असं टाईमनं म्हटलं आहे. या लेखात 1984 मधील शिखविरोधी दंगल आणि 2002 मधील गुजरात दंगलीचा उल्लेख आहे. 'काँग्रेस नेतृत्व 1984 च्या दंगलीतल्या आरोपांपासून मुक्त नाही. मात्र तरीही त्यांनी स्वत:ला उन्मादी गर्दीपासून दूर ठेवलं. पण 2002 मध्ये मुख्यमंत्री असताना मोदी शांत बसले. त्यांचं हेच मौन दंगल घडवणाऱ्यांच्या पथ्यावर पडलं,' अशी टीका टाइमनं केली आहे. 
 

Web Title: India's Divider in Chief PM Modi On Time Magazine Cover With Controversial Headline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.