रेल्वेने बनवली इंजिनाविना धावणारी ट्रेन, गाठणार ताशी 200 किमी वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 06:10 PM2018-10-23T18:10:44+5:302018-10-23T18:11:19+5:30

भारतीय रेल्वेनेही आता आधुनिकीकरणाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, रेल्वेच्या तामिळनाडूमधील कारखान्यात इंजिनाविना धावणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे.

Indian railway introduce high tech Train | रेल्वेने बनवली इंजिनाविना धावणारी ट्रेन, गाठणार ताशी 200 किमी वेग

रेल्वेने बनवली इंजिनाविना धावणारी ट्रेन, गाठणार ताशी 200 किमी वेग

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमध्ये ट्रेन चालवण्यासाठी डिझेल किंवा इलेक्ट्रिक इंजिनांचा वापर केला जातो. पण भारतीय रेल्वेनेही आता आधुनिकीकरणाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, रेल्वेच्या तामिळनाडूमधील कारखान्यात इंजिनाविना धावणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणारी ही ट्रेन ताशी 160 ते 200 किमी वेग गाठू शकते.

ट्रेन-18 असे या ट्रेनचे नामकरण करण्यात आले आहे. ही ट्रेन संपूर्णपणे संगणकीकृत असून, ती बुलेट ट्रेनच्या धर्तीवर विकसित करण्यात आली आहे. ही ट्रेन बनवण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च आला असून,  तिच्या बांधणीसाठी दीड वर्षाचा कालावधी लागला. या ट्रेनमध्ये 16 एसी आणि दोन एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे असतील, अशी माहिती या ट्रेनची बांधणी करणाऱ्या इंटिग्रल कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक सुधांशू मणी यांनी दिली.

 या ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष असे दोन बाथरूम आणि बेबी केअरसाठी विशेष स्थान देण्यात आलेआहे. तसेच ट्रेनच्या कोचमध्ये खास स्पेनमधून मागवण्यात आलेल्या सीट बसवण्यात आल्या आहे. या सीटचे वैशिष्ट्य म्हणजे या सीट पूर्ण 360 अंशांमध्ये वळू शकतात.

 अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेन सुमारे 160 ते 220 किमी वेगाने धावू शकते. आणीबाणीच्या परिस्थितीत ट्रेनच्या ड्रायव्हरशी संवाद साधता यावा यासाठी टॉक बॅक सुविधाही देण्यात आली आहे. अशी ट्रेन परदेशातून आयात केली असती तर सुमारे 170 कोटी रुपये खर्च आला असता. मात्र स्वदेशात या ट्रेनची बांधणी करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च झाले. 

स्वदेशी बांधणीची ही हायस्पीड ट्रेन आता धावण्यासाठी सज्ज झाली असून, मुरादाबाद-बरेली आणि कोटा-सवाई माधोपूर या रेल्वे मार्गांवर या ट्रेनची चाचणी होणार आहे. त्यानंतर देशातील प्रमुख रेल्वे मार्गांवर ही ट्रेन धावणार आहे.  

Web Title: Indian railway introduce high tech Train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.