- मयूर पठाडे

 
भारतासारख्या देशात सूर्यप्रकाश अत्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, तरीही सूर्यप्रकाशाच्या अभावी मानवी शरीरात ज्या कमतरता निर्माण होतात त्यानं बहुतांश भारतीय पिडीत आहेत, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार तर आता हेदेखील सिद्ध झालं आहे की वडिलांमध्ये जर व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मुलांनाही भोगावे लागू शकतात. अशा पालकांच्या मुलांची उंची आणि वजन खुंटित राहू शकते असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे. 
 
 
बाळाच्या जन्मापूर्वी आईचीच तेवढी तब्येत सुदृढ असली पाहिजे असं आपल्याकडे मानलं जातं. आपल्याबरोबरच जगात बर्‍याच ठिकाणीही असाच समज आहे. पण हा समज या नव्या संशोधनानं पुन्हा एकदा खोडून काढला आहे. बाळाच्या जन्मापूर्वी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आई जेवढी सुदृढ हवी तेवढाच बाबाही सक्षम असला पाहिजे. 
त्यामुळे बाबा पालकांनो लक्षात ठेवा, तुमचं बाळ जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ हवं असेल, तर तुम्हालाही तसंच असायला हवं. आपल्याला जर काही वाईट सवयी असतील, सुदृढ नसाल तर आधी आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि मगच बाळाला जन्म देण्याचा विचार करा..