कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राव, रेड्डी, पटनायक ठरतील किंगमेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 05:31 AM2019-05-12T05:31:21+5:302019-05-12T05:36:19+5:30

लोकसभा निवडणुकांत कोणत्याच एका पक्षाला वा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती व वायएसआर काँग्रेस हे पक्ष काय भूमिका घेणार, हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

If no one gets a clear majority, then Rao, Reddy and Patnaik will be Kingmaker | कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राव, रेड्डी, पटनायक ठरतील किंगमेकर

कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राव, रेड्डी, पटनायक ठरतील किंगमेकर

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत कोणत्याच एका पक्षाला वा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती व वायएसआर काँग्रेस हे पक्ष काय भूमिका घेणार, हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्याही पक्ष वा आघाडीला बहुमत न मिळाल्यास या तीन पक्षांची मनधरणी केल्याशिवाय सर्वात मोठा पक्ष वा आघाडीला पर्याय राहणार नाही.
बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती व वायएसआर काँग्रेस हे सध्या भाजप वा काँग्रेस यांच्यापैकी कोणत्याही आघाडीत नाहीत. त्यांनी आपापल्या राज्यात स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या असून, त्यांना तिथे भाजप व काँग्रेस यांचा सामना करावा लागला आहे. पंतप्रधान मोदी व भाजप यांनी या तिन्ही पक्षांना चुचकारण्याचा मध्यंतरी प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही.
हे पक्ष निवडणुकीनंतर नेमकी काय भूमिका घेणार, हे स्पष्ट झालेले नाही. ओडिशामध्ये लोकसभेच्या २१, आंध्र प्रदेशात २५ व तेलंगणात १७ अशा एकूण ६३ जागा आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकांत त्यापैकी बिजू जनता दलाने २०, वायएसआर काँग्रेसने ९ व टीआरएसने ११ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच ६३ पैकी ४० खासदार या तीन पक्षांचे होते. त्यांना यंदाही तितक्या वा त्याहून अधिक जागा मिळाल्यास तेच किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.


त्यापैकी टीआरएसचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रादेशिक पक्षांची आघाडी बनवण्याचा प्रयत्न चालवला असला तरी त्यांना यश येताना दिसत नाही. द्रमुक, जनता दल (धर्मनिरपेक्ष), बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस यापैकी एकाही पक्षाने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. राव यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची अलीकडेच भेट घेतली. पण त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही राव यांच्या आघाडीसोबत जाण्याची शक्यता नाही.
बिजू जनता दलाचे प्रमुख व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही भूमिका जाहीर केलेली नाही. चक्रीवादळात उचललेल्या पावलांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. तरीही पटनायक बोलायला तयार नाहीत. वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनीही आपले पत्ते आतापर्यंत उघड केलेले नाही. मात्र वायएसआर काँग्रेस व टीआरएस यांचा तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना विरोध आहे.
नायडू यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसची मैत्री केली आहे. त्यामुळे नायडू असलेल्या आघाडीत रेड्डी व चंद्रशेखर राव यांना जुळवून घ्यावे लागेल. अर्थात राजकारणात कोणीच कोणाचा कायम मित्र वा शत्रू नसतो. त्यापैकी चंद्रशेखर राव यांनी भाजपसोबत न जाण्याचे संकेत दिले आहेत. वायएसआर काँग्रेस हा पक्षच मुळी काँग्रेसमधील फुटीतून निर्माण झाला आहे. त्यामुळे तो पक्ष भाजपपेक्षा आपल्याकडे येण्याची अधिक शक्यता असल्याचे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.
मतदानाचा शेवटचा टप्पा १९ मे रोजी संपला की २१ मे रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. त्यास चंद्रशेखर राव उपस्थित राहतील, असे कळते. मात्र रेड्डी व पटनायक हे बैठकीला हयि राहणार का, हे अद्याप नक्की नाही.



उपपंतप्रधानपद हवे?
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी विरोधकांच्या आघाडीसह जाण्याचे ठरवल्याची चर्चा आहे. मात्र विरोधी पक्षांच्या आघाडीचे सरकार आल्यास आपणास उपपंतप्रधानपद दिले जावे, अशी त्यांची अट असल्याचे सांगण्यात येते. त्यांची ही अट टीआरएसच्या नेत्यांनी काँग्रेसपर्यंत पोहाचवली आहे; पण निकाल लागेपर्यंत त्याबाबत निर्णयच घेऊ नये, असे काँग्रेसने ठरवले आहे.

Web Title: If no one gets a clear majority, then Rao, Reddy and Patnaik will be Kingmaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.