ऑनलाइन लोकमत

तिरुवनंतपुरम, दि. 19 - केरळमधल्या कासरागोड नगरपालिकेच्या हद्दीतील तिरुत्ती वॉर्डमधल्या एका रस्त्याचं नामकरण गाझा स्ट्रीट असं करण्यात आलं आहे. त्यामुळे IB, NIA यांसारख्या गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच सुरक्षा यंत्रणांची या गाझा स्ट्रीट रस्त्यावर विशेष नजर आहे. खरं तर इज्राएल आणि पॅलेस्टिनी लोकांमध्ये गाझा पट्टी या नावाच्या जागेवरूनच वाद आहे. सुरक्षा यंत्रणांनी या नामकरणामागे कट्टरपंथीयांना जबाबदार धरलं आहे.

केरळ राज्यातून जवळपास 21 तरुण गेल्या वर्षीपासून बेपत्ता झाले आहेत. ते सर्व अशाच कट्टरपंथीयांच्या प्रभावात असल्याची चर्चा आहे. तिरुत्ती येथे जामा मशिदीजवळच्या एका रस्त्याचं नाव गेल्या महिन्यात गाझा असं ठेवण्यात आलं. याचं उद्घाटन कासरगोड जिल्हा पंचायत अध्यक्ष बशीर यांनी केलं. बशीर यांना शेवटच्या मिनिटाला रस्त्याच्या उद्घाटनाला बोलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच मला या वादविवादाबाबत काहीच माहीत नाही, असंही ते म्हणाले आहेत.

नगरपालिका अधिका-यांनाही रस्त्याचं नाव गाझा हे ठेवण्यात आल्याची कल्पना नाही. अधिका-यांना आम्हाला याबाबत काहीच माहिती नसल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या नामकरणाचा प्रस्तावही नगरपालिकेत मंजूर करण्यात आला नव्हता. त्यामुळे गुप्तचर यंत्रणाही खडबडून जाग्या झाल्या आहेत.

कासरागोड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पी रमेश म्हणाले, रस्त्याच्या गाझा स्ट्रीट या नामकरणाचा प्रस्ताव नगरपालिकेत सादर केल्यास त्याला विरोध दर्शवला जाईल. तसेच गुप्तचर यंत्रणा या भागातील विकासावर लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे इसिससारख्या कट्टरपंथी दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी अनेक तरुण देश सोडून गेले आहेत. त्यात जास्त करून कासरागोड तालुक्यातील तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे सद्यस्थितीत गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.