hyderabad youth files fir against priya prakash varrier and producer for viral video song | इंटरनेटवर रातोरात स्टार झालेली प्रिया प्रकाश अडचणीत, गाण्यातील आक्षेपार्ह शब्दांमुळे तक्रार दाखल
इंटरनेटवर रातोरात स्टार झालेली प्रिया प्रकाश अडचणीत, गाण्यातील आक्षेपार्ह शब्दांमुळे तक्रार दाखल

हैदराबाद- डोळ्यांच्या अदाकारीने सोशल मीडियावर करोडो तरूणांना मोहात पाडणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश अडचणीत आली आहे.  ज्या गाण्याने प्रियाने अनेकांना भुरळ घातली व तिला स्टारडम मिळवून दिलं तेच गाणं प्रियासाठी अडचणीचं ठरलं आहे. हैदराबादमधील काही तरूणांनी गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेत प्रिया प्रकाश व सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. गाण्यातील शब्द धार्मिक भावना दुखावणारे असल्याचं म्हणत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. 

दोन दिवसांपूर्वी प्रिया प्रकाश सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली. तिच्या व्हिडीओने तिला कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रियाच्या सिनेमातील गाण्याच्या एका छोट्याशा क्लिपमुळे ती रातोरात स्टार झाली. पण आता हेच गाणं प्रियासाठी अडचणी वाढविणारं ठरतं आहे. 

टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, हैदराबादमधील काही तरूणांनी गाण्यातील शब्दांवर आक्षेप नोंदविला आहे. गाण्यावर आक्षेप घेत फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 'आम्हीदेखील या गाण्याचे आणि प्रियाचे चाहते झालो होतो. पण, हे गाणं मल्ल्याळम भाषेत असल्याने आम्ही त्याचा अर्थ इंटरनेटवर शोधला. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की या गाण्यात असे काही शब्द आहेत, ज्यामुळे आमच्या धर्माचा अपमान होतो. गाण्यातील शब्दांमुळे धार्मिक भावना दुखावल्यानं त्यांनी चित्रपट निर्माते आणि अभिनेत्री प्रिया प्रकाशविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

प्रिया प्रकाश स्टारर  'ओरू अडार लव' हा सिनेमा 3 मार्च रोजी प्रदर्शित होतो आहे. या सिनेमातील 'मानिका मलयारा पूवी' हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच गाण्यातील एक लहान क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामध्ये प्रिया तिच्या भुवया उडवताना दिसते आहे. तिची ही अदाकारी सोशल मीडियावर तरूणांच्या चांगल्याच पसंतीस उतरली. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फॉलोवर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. 
 


Web Title:  hyderabad youth files fir against priya prakash varrier and producer for viral video song
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.