शंकरसिंह वाघेलांनी गुजरातमध्ये भाजपाच्या तोंडचं पाणी पळवलं तेव्हा...

By अोंकार करंबेळकर | Published: December 12, 2017 03:15 PM2017-12-12T15:15:15+5:302017-12-12T15:27:50+5:30

मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगणाऱ्या शंकरसिंह वाघेला यांनी भाजपाचेच आमदार मध्यप्रदेशात नेऊन ठेवले. अचानक झालेल्या या घटनेमुळे भाजपामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.

How shankarsingh waghela fought in BJP's own bastion? | शंकरसिंह वाघेलांनी गुजरातमध्ये भाजपाच्या तोंडचं पाणी पळवलं तेव्हा...

शंकरसिंह वाघेलांनी गुजरातमध्ये भाजपाच्या तोंडचं पाणी पळवलं तेव्हा...

Next
ठळक मुद्देगुजरातमध्ये मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने शंकरसिंह वाघेला आणि त्यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले होते.मुख्यमंत्री केशुभाई पटेल देशाबाहेर असतानाच त्यांनी बंड घडवून आणले आणि भाजपात चांगलाच गोंधळ उडाला.

मुंबई- आमदार फुटणे, आमदार नाराज होणे किंवा सत्तेतीलच एखाद्या मंत्र्यांने सरकारचे अस्तित्त्व पणाला लावणे अशा घटना देशात विविध राज्यांमध्ये अनेकवेळा झाल्या आहेत. गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी 22 वर्षे सत्तेमध्ये आहे. पण हा 22 वर्षांचा काळ भाजपासाठी अगदीच सोपा आणि सुखासुखी सत्तेचा गेलेला नाही. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीच स्वपक्षाविरोधात बंड करणे, आमदार लपवून ठेवणे असे प्रकारही या काळामध्ये घडलेले आहेत. 90 च्या दशकात भाजपाचे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे शंकरसिंह वाघेला यांनी भाजपाची चांगली कोंडी केली होती.

 केशुभाई पटेलांविरोधात शंकरसिंह वाघेला यांनी दंड थोपटले होते. 1995 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाला गुजरात विधानसभेत 182 पैकी 121 जागा जिंकता आल्या होत्या. या विजयानंतर शंकरसिंह वाघेला आणि त्यांच्या समर्थकांना वाघेलाच मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. मुख्यमंत्री पदासाठी केशुभाई पटेल यांचे नाव जाहीर करण्यात आले. तेव्हा गुजरातमध्ये पक्षाच्या सरचिटणीस पदावरती असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनीही आपले वजन केशुभाईंच्या पारड्यात टाकले. या सर्व प्रकारामुळे वाघेला आणि समर्थक चांगलेच दुखावले होते, त्यातून मंत्रिमंडळातही पटेल आणि मोदी यांच्या जवळच्या लोकांनाच स्थान मिळाले अशी वाघेला समर्थक आमदारांची भावना तयार झाली होती.

याच वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये केशुभाई पटेल अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. त्यामुळे वाघेला यांना बंड करण्यासाठी पटेल भारताबाहेर असण्याची नामी वेळ साधता आली. आपल्या समर्थक आमदारांना घेऊन ते अहमदाबाद जवळच्या एका खेड्यात गेले. हे 55 समर्थक आमदार होते. परंतु तेथे पुरेसे संरक्षण नसल्याचे जाणवल्यावर त्यांनी या आमदारांना गुजरातबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु केला. एकीकडे महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा युतीचे सरकार आणि राजस्थानमध्ये भैरोसिंह शेखावत यांचे भाजपा सरकार असल्यामुळे कोठे जायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच. म्हणून त्यांनी शेजारच्या कॉंग्रेसशासित मध्यप्रदेशमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दिग्विजय सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. रात्रीच्या वेळेस दमानिया एअरवेजचे विमान या 55 आमदारांना घेऊन हवेत झेपावले तेव्हा कोठे या आमदारांना आपण मध्य प्रदेशात खजुराहोला चाललो असल्याचं समजलं. खजुराहोला एका उत्तम हॉटेलमध्ये सोय करण्यात आली.

इकडे या बंडाळीची बातमी फुटल्यावर भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच गडबड उडाली. शेवटी अटलबिहारी वाजपेयी यांनी मुख्यमंत्रीपदी केशुभाई पटेलही नकोत आणि वाघेलाही नकोत असा फॉर्म्युला मांडला आणि सुरेश मेहता यांना मुख्यमंत्रीपदी नेमण्यात आले. त्यामुळे बंड शमले तरी वाघेला-पटेल गटातला वाद शमला नव्हता. खजुराहोला जाऊन राहणाऱ्या आमदारांना गुजरातमध्ये खजुरीया नावाने ओळखले जाते. तर केशुभाई समर्थकांना त्यांच्या प्रत्येक आदेशाला जी हुजुर म्हणण्याच्या वृत्तीमुळे हुजुरिया तर कोणत्याच गटात नसणाऱ्या आमदारांना मजुरीया असं ओळखलं जाई. 1996 साली लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये वाघेला गोध्रा मतदारसंघातून लढले मात्र त्यांचा तेथे पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या 48 आमदारांना घेऊन राष्ट्रीय जनता पार्टी नावाचा पक्ष काढला आणि कॉंग्रेसच्या मदतीने एकदाचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी थोड्या कालावधीसाठी दिलिप पारिख यांना मुख्यमंत्री केले आणि 1998 साली त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्येच विलिन केला. त्यानंतर ते कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार, खासदारही झाले. संपुआच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांना केंद्रामध्ये वस्रोद्योग खात्याची जबाबदारीही मिळाली. 

शंकरसिंह वाघेला आता काय करतात?
कॉंग्रेसमध्ये पटत नसल्यामुळे वाघेला जुलै महिन्यात बाहेर पडले आहेत. परवाच त्यांनी एका पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर टीका केली आहे. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी स्वतःच्या पक्षाचा पराभव करण्यासाठी भाजपाकडून सुपारी घेतली आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीका केली आहे. तर मी राहुल गांधी यांना कॉंग्रेसच्या 90 जागा निवडून येऊ शकतात असे सांगितले होते मात्र कॉंग्रेसच्या काही नेत्यांना ते नको होते असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपाकडे कार्यकर्त्यांचा मोठा आधार आणि मजबूत संघटना आहे. त्यांना आव्हान द्यायचे होते किमान सहा महिने आधी लोकांमध्ये डाऊन काम करायला हवे होते आता फार उशिर झाला आहे असेही त्यांनी सांगितले. कॉंग्रेसबरोबर हार्दिक पटेलवरसुद्धा त्यांनी जोरदार टीका केली आहे. काही लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी काम करतात, त्यामध्ये हार्दिकचा समावेश आहे. तो या निवडणुकीनंतर इतिहासजमा होईल असे वाघेला यांनी सांगितले.

केशुभाई पटेल आणि गुजरातमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे मोदी
खजुराहो बंडाच्यावेळीस गुजरातच्या राजकारणातल्या पात्रांना पुढच्या आयुष्यात नव्या भूमिका करायला मिळाल्या. केशुभाई पटेल नंतर मुख्यमंत्री झाले, 2012 साली त्यांनी भाजपाही सोडला आणि गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना केली. तर नरेंद्र मोदी यांना सर्वाधीक काळ गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान मिळाला. नरेंद्र मोदी गुजरातचे  सलग 12 वर्षे 4 महिने मुख्यमंत्री राहिले. 2014 साली ते भारताचे पंतप्रधान झाले. गुजरातमधून जाणारे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. गेली अनेक वर्षे नरेंद्र मोदी हे भाजपाचे सर्वाधीक काळ मुख्यमंत्री पदावरीत राहणारे नेते म्हणून ओळखले जात. त्यांचा हा विक्रम आता छत्तिसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी मोडला आहे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानसुद्धा लवकरच हा सन्मान मिळवतील.

Web Title: How shankarsingh waghela fought in BJP's own bastion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.