How much does Prime Minister Narendra Modi spend on clothes? RTI discloses information | कपड्यांवर किती खर्च करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी ?, आरटीआयमधून माहिती उघड

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या कपड्यांवर किती खर्च करतात, याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करते, यासंदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती. विशेष म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्या कपड्यांवरही सरकारनं किती खर्च केला, याबाबतही अर्जातून विचारणा केली होती. त्यावर पंतप्रधान कार्यालयानंही स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही कोणत्याही माजी पंतप्रधानांच्या खासगी बाबींसंदर्भात अधिकृत रेकॉर्ड ठेवत नाही. तसेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर कोणताही खर्च करत नाही, मोदी स्वखर्चानं कपडे विकत घेतात, असं उत्तरही पंतप्रधान कार्यालयानं माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांना दिलं आहे.

रोहित सबरवाल म्हणाले, अनेकांना वाटतं केंद्र सरकार पंतप्रधानपदाच्या व्यक्तीच्या कपड्यांवर पैशांची उधळपट्टी करते. परंतु केंद्र सरकार पंतप्रधानांच्या कपड्यांवर कोणताही खर्च करत नाही, ही माहिती मला आरटीआयमधून प्राप्त झाली आहे. अनेक राजकीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पेहरावावरून टीका करत असतात. तसेच त्यांचं कपाट महागड्या कपड्यांनी भरलेलं आहे, असा आरोपही विरोधकांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी माहिती मागवली होती.

गेल्या वर्षी अरविंद केजरीवालांनीही मोदी प्रत्येक दिवशी कपड्यांवर 10 लाख खर्च करतात, असा आरोप केला होता. मोदींच्या सुटाच्या किमतीवरून अनेक वादही उद्भवले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमातून सुटाची किंमत 10 लाखांच्या आसपास असल्याचं दाखवण्यात आलं होतं. या महागड्या सुटावरूनच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकार सूट-बूटवाली सरकार असल्याची टीकाही केली होती. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांची स्टाईल प्रसिद्धीच्या झोतात आली होती. परंतु आता माहिती अधिकार कार्यकर्त्यानं आरटीआयच्या माध्यमातून खुलासा केल्यामुळे मोदींच्या कपड्यांबाबतचे वाद शमले, अशी आशा व्यक्त केली जात आहे.