ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाल्यापासून अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मात्र भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मतदान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अमित शहा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क कसा काय मिळाला ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. 
 
संबंधित बातम्या 
 
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यास मतदानाचा हक्क मिळतो का ? त्यांना तो अधिकार आहे का ? असे प्रश्न विचारले जात आहेत. कारण राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यासाठी विधानसभा, लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य असणं गरजेचं आहे. 
 
पण अमित शहा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असण्यासोबतच गुजरातचे विद्यमान आमदारदेखील आहेत. त्यामुळे त्यांना अधिकृतपणे मतदानाचा हक्क असून त्यांनी तो बजावला. मतदान करताना त्यांनी भाजपाध्यक्ष म्हणून नाही, तर गुजरातचे आमदार म्हणून राष्ट्रपती मतदानाचा हक्क बजावला आहे. गुजरात विधानसभेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत अमित शाह हे नारायणपुरा मतदारसंघातून निवडून आले होते.
 
राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपाच्या नेतृत्वाखाली रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्याकडून प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांचे एकूण मूल्य 10,98,882 असून, विजयासाठी 5,49,442 आवश्यक आहे. रामनाथ कोविंद सहज आणि चांगल्या मताधिक्क्याने विजयी होतील अशा विश्वास केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे. 
 
 राष्ट्रपतिपदाचे रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद ६२ टक्क्यांहून अधिक मतांसह सहजपणे निवडून येऊ शकतात असा अंदाज आहे. तथापि, त्यांच्या मतांची टक्केवारी विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना २०१२ मध्ये मिळालेल्या ६९ टक्के मतांहून कमी असेल. 
राष्ट्रपतिपदासाठी पहिल्यांदाच दलित विरुद्ध दलित अशी लढाई होत आहे. आकडे भाजपाच्या बाजूने असून, त्यांच्या उमेदवाराला जवळपास सात लाख मते मिळू शकतात. ही संख्या १० लाख ९८ हजार ९०३ मतांच्या सुमारे दोन तृतीयांश आहे.