इतिहासाची पाने: देशातील पहिल्या निवडणुकीपूर्वीची हंगामी लोकसभा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:42 AM2019-03-15T04:42:02+5:302019-03-15T04:42:20+5:30

राष्ट्रपती पद निर्माण करण्यात आले. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. पुढे ते दोन टर्म (१० वर्षे) राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीतच लोकसभेची पहिली निवडणूक झाली.

History pages: India's first Lok Sabha election! | इतिहासाची पाने: देशातील पहिल्या निवडणुकीपूर्वीची हंगामी लोकसभा!

इतिहासाची पाने: देशातील पहिल्या निवडणुकीपूर्वीची हंगामी लोकसभा!

googlenewsNext

- वसंत भोसले

लोकसभेची पहिली निवडणूक झाल्यानंतर १७ एप्रिल १९५२ रोजी लोकसभा गठीत करण्यात आली. तत्पूर्वी, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात होते. मात्र, त्यासाठी हंगामी लोकसभा स्थापन करण्यात आली होती. ज्येष्ठ विचारवंत एम. एन. रॉय यांनी १९३४ मध्ये स्वतंत्र भारताची मागणी करताना घटना समिती स्थापन करावी, अशी प्रथम मागणी केली होती. भारतीय काँग्रेसने पुढील वर्षी ठराव करून या मागणीला अधिकृत स्वरूप दिले.

पुढे १९४० मध्ये ब्रिटिशांनी ही मागणी मान्य केली. मात्र, ती दुसऱ्या महायुद्धाच्या वातावरणात कागदावरच राहिली. भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय झाल्यावर घटना समिती स्थापन करण्यासाठी निवडणुका झाल्या. त्यावर काँग्रेस पक्षाचे २०८, मुस्लीम लीगचे ७३, इतर पक्षांचे १५ आणि संस्थानिकांचे ९३ सदस्य निवडले गेले. मुस्लीम लीगने स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीवरून समित्यांच्या बैठकांवर बहिष्कार घातला. पाकिस्तानची निर्मिती होण्याची शक्यता निर्माण होताच त्यांनी स्वतंत्र घटना समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्या सदस्यांव्यतिरिक्त आणि काही संस्थानिकांचे खालसाकरण झाल्यावर २९९ सदस्यांच्या समितीने स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याचे कार्य सुरू केले. हेच सदस्य हंगामी लोकसभेचे सदस्य राहिले. भारतीय घटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली आणि प्रत्यक्षात प्रजासत्ताक राज्याची उद्घोषणा २६ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. घटना समितीचे सर्व सदस्य राज्यघटनेतील तरतुदींनुसार लोकसभेची निवडणूक होईपर्यंत हंगामी सदस्य म्हणून कार्य करू लागले. लोकसभेची निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला. त्याची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. आयोगाने सुमारे दोन वर्षे तयारी करून निवडणूक घेण्याची घोषणा केली. लोकसभेची ही पहिली निवडणूक होती. निवडणूक आयोगाचे आयुक्त सुकुमार सेन होते.

मतदार याद्या तयार करणे, मतदान केंद्रे तयार करणे, निवडणूक चिन्हे तयार करणे, उमेदवारी अर्ज तयार करणे, आदी प्रचंड काम निवडणूक आयोगाने दोन वर्षे केले. ही निवडणूक २५ आॅक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ या दरम्यान जवळपास चार महिने चालली होती. तत्पूर्वीची पाच वर्षे भारताची राज्यघटना बनविणे, निवडणूक आयोगाची स्थापना करणे, भाषावार प्रांतरचना करणे, संस्थाने खालसा करणे, अशा अनेक घटना, घडामोडीने देश तयार होत होता एका नव्या लोकशाहीप्रधान देशाच्या स्वागतासाठी. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात सर्व विचारांचे, पक्षांचे आणि विविध गटाचे सदस्य होते. त्या सर्वांना घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू देशाचा कारभार पाहत होते. घटना समितीच्या सदस्यांबरोबरच सी. राजगोपालचारी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पहिले भारतीय आणि शेवटचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी लॉर्ड माऊंटबॅटनकडून २१ जून १९४८ रोजी सूत्रे स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० रोजी देश प्रजासत्ताक म्हणून घोषित होताच हे पद रद्द करण्यात आले.
 

 

Web Title: History pages: India's first Lok Sabha election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.