एकेकाळी भाजपालाच पराभूत करणारं निवडणूक यंत्र अमित शाह यांच्या हाती येतं तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 11:38 AM2018-03-05T11:38:46+5:302018-03-05T14:19:28+5:30

भारतीय जनता पार्टीला काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्य भारतामध्ये पसरता आले नव्हते. स्थानिक पक्ष आणि काँग्रेस हेच दोन पर्याय येथे लोक निवडत असत.

Himanta biswa sarma becomes BJP's election machine in north east India | एकेकाळी भाजपालाच पराभूत करणारं निवडणूक यंत्र अमित शाह यांच्या हाती येतं तेव्हा...

एकेकाळी भाजपालाच पराभूत करणारं निवडणूक यंत्र अमित शाह यांच्या हाती येतं तेव्हा...

Next

मुंबई - भारतीय जनता पार्टीला काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्य भारतामध्ये पसरता आले नव्हते. स्थानिक पक्ष आणि काँग्रेस हेच दोन पर्याय येथे लोक निवडत असत. पण गेल्या चार वर्षांमध्ये भाजपाने नेडाचा (नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक फ्रंट) प्रयोग करत काही ठिकाणी स्वबळावर तर काही राज्यांत आघाडी करत ईशान्य भारतात काँग्रेसला सत्तेतून दूर केले आहे. या सर्व 'नेडा'प्रयोगामागे एकच यंत्र आहे ते म्हणजे हेमंतो बिस्वा सर्मा. एकेकाळी काँग्रेसला सत्ता समीकरण जुळवायला, आसाममधील सर्व सत्ताप्रश्नात मदत करणारा हा प्रभावी तरुण नेता भारतीय जनता पक्षाच्या गोटात आला आणि भाजपाला ईशान्येत अच्छे दिन आले. मार्च 2010 साली झालेल्या आसामातून राज्यसभेच्या दोन जागांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला काही मतं कमी पडत होती. या दोन उमेदवारांना विजयी करण्याचं काम एका आसामी नेत्याकडे सोपविण्यात आलं. तो नेता होता हेमंतो बिस्वा सर्मा.

मतदानाच्या दिवशी हेमंतो स्वतःच भाजपाच्या 4 आमदारांना आपल्या गाडीतून घेऊन विधानसभेत आले तेव्हा सर्वांना निकाल समजलाच होता. काँग्रेसचे नझनीन फारक आणि सिल्वियन कोंडापन अनुक्रमे 43 आणि 42 मते घेऊन विजयी झाले तर संयुक्त विरोधीपक्षाच्या उमेदवारांना 40 मते पडली होती. यानंतर भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकारांसमोर अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली होती. ज्या राज्यातून पंतप्रधान(तत्कालीन) डॉ. मनमोहन सिंह विजयी होतात त्या राज्यात काँग्रेसचे सदस्य, मंत्री, मुख्यमंत्री लोकशाहीचा खून करतात, अशी जबरदस्त टीका त्यांनी केली होती. पण मार्च 2010 आणि मार्च 2018 या दोन महिन्यांमध्ये बराच फरक आहे. हेच सर्मा आता भाजपाच्या गोटात आहेत आणि साम दाम दंड भेद असे सगळे उपाय करुन काँग्रेसला पराभूत करत आहेत. 


हेमंतो यांचा राजकारणाशी संबंध अत्यंत लहान वयापासून आला. सहाव्या इयत्तेत शिकत असताना ते ऑल आसाम स्टुडंटस युनियन म्हणजे 'आसू'चे काम करू लागले. प्रचारपत्रक पोहोचवण्यासारख्या कामांपासून त्यांनी आपल्या कामाला शाळेतूनच सुरुवात केली. 1993 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1996 मध्ये सर्मा जालकबरीमधून पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांनी नंतर मागे वळून पाहिलेच नाही. गेल्या विधानसभेच्या सुरुवातीच्या काळात ते मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे उजवा हात मानावेत इतक्या जवळ होते. मात्र 2012पासून गोगोई आणि सर्मा यांच्यात दुही निर्माण झाली. ही अविश्वास आणि विरोधाची दरी दिवसेंदिवस वाढतच गेली.




 

2015 साली आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई, काँग्रेस नेते सी. पी. जोशी यांच्यासह आसामच्या विविध प्रश्नांवर भेटण्यासाठी ते राहुल गांधी यांच्याकडे गेले. मात्र त्यावेळेस राहुल यांचे सर्व लक्ष त्यांच्या पाळीव कुत्र्याकडेच होते असे ते सांगतात. बैठकीत एका वेळेस तर सी. पी . जोशी आणि गोगोई यांच्यात मोठा वाद झाला तरीही राहुल शांत राहून कुत्र्याशी खेळत राहिले. या कुत्र्याने पाहुण्यांसाठी ठेवलेल्या बिस्किटातील बिस्कीट उचलल्यावरही राहुल शांत राहून हसत होते असे हेमंतो सांगतात. त्याचवेळेस त्यांनी काँग्रेसला निरोप देण्याचा निर्णय घेतला. ही बिस्किटांची गोष्ट सर्मा आजही सर्वांना वारंवार सांगतात.


आसामच्या पक्षस्थितीबाबत नेतृत्व गंभीर नसल्याचे दिसताच ते भाजपामध्ये आले आणि इथे भाजपाला अच्छे दिन आले. आसामध्ये भरघोस यश मिळाल्यावर मणिपूर आणि त्रिपुरा विजय त्यांनी नेडाच्या माध्यमातून मिळवला. मेघालयात सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेसला सत्तेतून दूर करत कॉनराड यांना नोडाच्या गोटात आणून पाठिंबा दिला. असे एकेक राज्य त्यांनी भाजपाच्या खात्यात ओढून घेतले आहे. 

भाजपात आल्यावर त्यांना विविध जबाबदा-या मिळाल्या. नेडाचे समन्वयक पद तर मिळालेच त्याहून आसाममध्ये अर्थ, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटन ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे सोपवली गेली आहेत. आसामचे मुख्यमंत्रिपद सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे असले तरी सर्मा हे दुसरं सत्ताकेंद्रच मानलं जातं.

 

Web Title: Himanta biswa sarma becomes BJP's election machine in north east India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.