काँग्रेसमुळे गुजरातमध्ये भाजपाला गाळावा लागतोय घाम, हिमाचल प्रदेशात मात्र भगवा फडकण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:36 AM2017-11-04T00:36:03+5:302017-11-04T00:38:28+5:30

हिमाचल प्रदेशात भाजपाचा भगवा ध्वज फडकण्याच्या तयारीत असला तरी गुजरातेत मात्र पक्षाला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांना विजयरथ अखंडित ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत.

In the Himachal Pradesh, it is likely that saffron must be sown in Gujarat due to Congress' sweat | काँग्रेसमुळे गुजरातमध्ये भाजपाला गाळावा लागतोय घाम, हिमाचल प्रदेशात मात्र भगवा फडकण्याची शक्यता

काँग्रेसमुळे गुजरातमध्ये भाजपाला गाळावा लागतोय घाम, हिमाचल प्रदेशात मात्र भगवा फडकण्याची शक्यता

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात भाजपाचा भगवा ध्वज फडकण्याच्या तयारीत असला तरी गुजरातेत मात्र पक्षाला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांना विजयरथ अखंडित ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये निवडणूक दौरे ज्या वेगाने चालवले आहेत, त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना सुखाने झोपही येईनाशी झाली आहे. गुजरातच्या आधी हिमाचल प्रदेशात मतदान होणार आहे. पण राहुल गांधी व काँग्रेसने सारी शक्ती गुजरातमध्ये लावली असून, हिमाचल प्रदेशला मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या खांद्यावर सोपवले आहे.
हिमाचल प्रदेश आपल्या
हातातून निसटत चालल्याची जाणीव काँग्रेस नेत्यांना झाली आहे. त्यामुळे चांगली शक्यता असलेल्या गुजरातेत अधिक प्रयत्न करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे.

काँग्रेसचे गणित
काँग्रेसने गुजरात जिंकण्यासाठी जातींच्या समीकरणांच्या आधारे धोरणे आखली. गुजरातेत ४० टक्के लोकसंख्या मागासवर्गीय आहे. विधानसभेच्या एकूण १८२ जागा असून, मागासवर्ग ७५ जागांवर प्रभाव टाकू शकतो, हे पाहून राहुल गांधी यांनी मागासवर्गीयांचा नेता अल्पेश ठाकूर याला काँग्रेसमध्ये आणले. काँग्रेसचे दुसरे लक्ष्य होते पाटीदार (पटेल) समाज. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्याशी चर्चा सुरू आहे.

पाटीदार समाज हातातून जाऊ नये यासाठी भाजपाची धडपड
भाजपाला हे पचवणे अवघड झाले असून, भाजपा व त्यांचे नेते पाटीदारांचे ऐक्य तोडण्याच्या प्रयत्नांत आहेत. पाटीदारांचे काही नेते भाजपाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यानंतर हार्दिक पटेल यांनी काँग्रेससोबत उघडपणे जाण्याचे टाळले असले तरी आपण भाजपाला पराभूत करणार, ही त्यांची भूमिका कायम आहे.
म्हणजेच काँग्रेसला त्यांची मदतच होईल. राज्यात पाटीदार १२ टक्के आहेत तरी ते ३५ जागांचे निकाल बदलून ५० ते ५२ आमदार पाठवू शकतात. पटेल समाज परंपरेने भाजपासोबत असून, तो हातातून जाऊ नये, यासाठी भाजपाने प्रयत्न केले तरी हार्दिक यांचा पाठिंबा काँग्रेसलाच असेल.

जिग्नेश मेवानी देणार काँग्रेसला पाठिंबा
दलितांचे नेते जिग्नेश मेवानी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाहीत. परंतु काँग्रेसला जिग्नेश यांचा पाठिंबा निश्चित आहे. राज्यात दलित ७ टक्के असून, ते राखीव मतदारसंघांतून १३ जागांवर प्रभाव टाकू शकतात.

मोदी-शहांसमोर सोपे नाही
गुजरातमध्ये दलित, ओबीसी यांनी मुस्लिमांसह काँग्रेसला मतदान केल्यास २२ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाची अडचण होईल. परंतु काँग्रेससमोर मोदी-शहा मैदानात असल्यामुळे सारे काही सोपे नाही. मोदी-शहा हे कंबर बांधून आपला बालेकिल्ला सुरक्षित राखण्याच्या प्रयत्नांत आहेत.

Web Title: In the Himachal Pradesh, it is likely that saffron must be sown in Gujarat due to Congress' sweat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.