Hadiya free to live with her husband says SC sets aside Kerala HC order | हादियाला पतीसोबत राहण्याचा संपूर्ण अधिकार- सर्वोच्च न्यायालय
हादियाला पतीसोबत राहण्याचा संपूर्ण अधिकार- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवून लग्नानंतर मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या हादियाला तिच्या पतीसोबत राहण्याचा पूर्ण अधिकारी असल्याचा निर्णय दिला. हादियाला तिच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा कायदेशीर हक्क आहे, असेही यावेळी न्यायालयाने सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. यामुळे हादियाला मोठा दिलासा मिळाला आहे. ती आता आपला पती शफीसोबत राहू शकणार आहे. परंतु, राष्ट्रीय तपासयंत्रणा या प्रकरणातून बाहेर आलेल्या गोष्टींची चौकशी सुरू ठेवू शकते, असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले. 

मात्र, या निकालानंतर हादियाचे वडील अशोकन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माझ्या मुलीला एका दहशतवाद्याबरोबर जाऊन दिले, याचे मला दु:ख वाटते, असे अशोकन यांनी म्हटले. मात्र, मी माझा कायदेशीर लढा सुरुच ठेवेन. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून या प्रकरणाची चौकशी सुरूच आहे. कारण, शफी जहाँ हा दहशतवादी असल्याचा त्यांना दाट संशय आहे, असे अशोकन यांनी सांगितले.  

गेल्यावर्षी हादियाने मुस्लिम धर्म स्वीकारत शफी जहाँ नावाच्या इसमासोबत लग्न केले होते. यानंतर तिचे वडील अशोकन के.एम. यांनी तिच्या या लग्नाविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. केरळ हायकोर्टाने या प्रकरणाला 'लव्ह जिहाद' मानत हे लग्न अवैध ठरवले होते. हादियाचे पती शफी यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

गेल्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयाने हादियाच्या बाजूने निकाल दिला होता. हादिया सध्या तामिळनाडूत शिक्षण घेत आहे. कथित लव्ह जिहादचा बळी ठरलेल्या हादियाला तामिळनाडूत वैद्यकीय शिक्षणासाठी परत पाठविण्याच्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, आपल्याला आपला पती शफीला भेटण्याचं स्वातंत्र्य नसल्याचं हादियाने सांगितले होते. 


Web Title: Hadiya free to live with her husband says SC sets aside Kerala HC order
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.