अहमदाबाद -  अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केवळ 11 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. मात्र असे असले तरी गुजरातमध्ये अडचणीत असलेल्या भाजपाच्या डोक्याला ताप देण्यासाठी आपने जोरदार पूर्वतयारी केली आहे. आम आदमी पक्ष आपले उमेदवार नसलेल्या सर्व ठिकाणी भाजपाविरोधात प्रचार करणार आहे. आपचे गुजरात प्रदेश प्रभारी गोपाल राय यांनी ही माहिती दिली आहे. 
 गोपाल राय म्हणाले की, "आम आदमी पक्षाचे गुजरातमधील प्रचार अभियान केवळ 11 जागांपुरते मर्यादित असेल. मात्र आपच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण राज्यात प्रचार अभियान चालवले आहे. गुजरातमध्ये भाजपाविरोधात प्रचंड रोष आहे. मात्र काँग्रेसच्या सुमार प्रचारामुळे तिथे भाजपाला आव्हान मिळत नाही आहे. त्यामुळे मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी आप निवडणूक लढवत नसलेल्या ठिकाणांमध्येही आप प्रचार करणार आहे." आप गुजरातमध्ये प्रत्येक मतदारसंघासाठी वेगळा जाहीरनामा तयार करत आहे. ग्रामसभेच्या स्तरावर जाऊन आपचे कार्यकर्ते जनतेमध्ये जनजागृती करणार आहेत. अशी माहितीही त्यांनी दिली.  
दुसरीकडे, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडल्याने गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर आहे. त्याचेच प्रतिबिंब नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीच्या ओपिनियन पोलमध्ये दिसून आले आहे. या आोपिनियन पोलनुसार भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट होत असल्याच अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितही गुजरातमधील सत्ता टिकवण्यात भाजपा यशस्वी ठरणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हा सर्व्हे 26 ऑक्टोबर 1 नोव्हेंबरदरम्यान गुजरातमधील 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आला होता. या ओपिनियन पोलमध्ये 200 पोलिंग बुथमधील 3 हजार 757 जणांचे मत जाणून घेण्यात आले. या ओपिनियन पोलनुसार काँग्रेसला 41 टक्के तर भाजपाला 47 टक्के मते मिळतील. तर मतांचे जागांमध्ये होणारे रूपांतर पाहिल्यास काँग्रेसला 58 ते 64 जागा आणि भाजपाला 113 ते 121 जागा मिळतील. तर इतरांना 1 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.  2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 48 टक्के मते  आणि 116 जागा मिळाल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची मतांची टक्केवारी 60 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आगामी मतदानात मतांच्या टक्केवारीत वर्तवण्यात आलेली लक्षणीय घट भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.