Gujarat election: Campaigning for the first phase will be stopped today | गुजरात निवडणूक: पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, मोदी, शाह आणि राहुल गांधी यांच्या प्रचारसभा

ठळक मुद्दे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या काही तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या आज गुजरातमध्ये रॅली होतील.

अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या काही तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या आज गुजरातमध्ये रॅली होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरतमध्ये रॅलीला संबोधित करणार आहेत. गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान 9 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. 89 जागांसाठी हे मतदान पार पडेल. 

पंतप्रधान मोदींना घेरण्याच्या तयारीत काँग्रेस
गुरूवारी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या जिवशी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. यासाठी राज्यभरात काँग्रेसकडून पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे जवळपास 25 ते 30 दिग्गज नेते गुजरातच्या विविध शहरामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गेल्या 8 दिवसांपासून ट्विटरवरून जे प्रश्न उपस्थित करत आहेत, तेच प्रश्न काँग्रेसचे नेते आजच्या पत्रकार परिषदांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या इतर नेत्यांना विचारणार आहेत. 

विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस मागणार भाजपाकडून उत्तर
आज तक या वृत्तवाहिनीशी केलेल्या खास बातचितमध्ये गुजरात मीडियाचे इंचार्ज पवन खेडा यांनी सांगितलं की, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षात झालेल्या कामांबद्दल प्रश्न उपस्थित केले जातील. भाजपाने ज्या मुद्द्यावर मौन बाळगलं आहे, तेचे प्रश्न विचारले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाच्या कुठल्याही नेत्याला गुजरातमध्ये विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो, तेव्हा ते सरळ उत्तर देत नाहीत, असं काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंह यांनी म्हंटलं आहे. 

राहुल गांधी यांनी रॅलीमधून उपस्थित केले प्रश्न
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये संबोधित केलेल्या अनेक रॅलीमधून गुजरातमधील विकासाचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर पंतप्रधान आणि भाजपाकडून उत्तराची अपेक्षा आहे. पण त्यावर कुणी काही बोलायला तयार नसतं, असा आरोप त्यांनी केला आहे. 

9 डिसेंबर रोजी होणार पहिल्या टप्प्यातील मतदान
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबर रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 182 जागांपैकी 89 जागांसाठी मतदान पार पडेल. या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात क्षेत्रात निवडणूक होईल. मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह 977 उम्मेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सौराष्ट्रमध्ये एकुण 11 जिल्हे येतात. त्यामध्ये कच्छ हा सगळ्यात मोठा जिल्हा असून त्या 10 तालुके, 939 गावं आणि सहा नगरपालिकांचा समावेश आहे.