'असा' आला मोबाईलमध्ये आधार हेल्पलाइन नंबर; गुगलकडूनच 'गलती से मिस्टेक'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 08:32 AM2018-08-04T08:32:21+5:302018-08-04T10:40:02+5:30

लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये (फोनबुक) शुक्रवारी आधारचा हेल्पलाइन नंबर अचानक सेव्ह झाल्याचे निदर्शनास आले, यावर गुगलकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Google Takes the Blame for UIDAI Number Showing Up in People's Phonebooks | 'असा' आला मोबाईलमध्ये आधार हेल्पलाइन नंबर; गुगलकडूनच 'गलती से मिस्टेक'

'असा' आला मोबाईलमध्ये आधार हेल्पलाइन नंबर; गुगलकडूनच 'गलती से मिस्टेक'

नवी दिल्ली -  देशभरातील लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये (फोनबुक) शुक्रवारी (3 ऑगस्ट) आधारचा हेल्पलाइन क्रमांक 18003001947  UIDAI या नावानं आपोआप सेव्ह झाला होता. यामुळे अनेकांना धक्का बसला. आपण स्वतःहून सेव्ह न करताही हा नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आलाच कसा? या प्रश्नानं अनेकांना भंडावून सोडलं होतं.  मात्र, या प्रकरणात गुगलची चूक असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द गुगलनं या प्रकरणी आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली आहे. तसंच कोणताही सायबर हल्ला झाला नसल्याचंही स्पष्ट केले आहे. 

(मित्रों, मोबाईलची कॉन्टॅक्ट लिस्ट लगेच तपासा... आपोआप सेव्ह झालाय 'हा' क्रमांक)

गुगलचा माफीनामा
लाखो स्मार्टफोनधारकांना आमच्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला याचा आम्हाला खेद आहे. झालेल्या चुकीबाबत आम्ही माफी मागतो. UIDAI आणि अन्य 112 हेल्पलाईन क्रमांक अॅन्ड्रॉईडच्या सेटअपमध्ये 2014 साली कोड करण्यात आले होते, अशी माहिती इंटरनल सर्व्हेत समोर आली आहे. हा क्रमांक एकदा ग्राहकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह झाला की डिव्हाईस बदलल्यानंतरही हाच क्रमांक पुन्हा नव्या डिव्हाईसमध्ये सेव्ह होतो. मात्र, तुमचा मोबाईल हॅक झालेला नाही. कोणताही सायबर हल्ला झालेला नाही.  UIDAIचा आपोआप सेव्ह झालेला क्रमांक तुम्ही डिलीट करू शकता.  नवीन अॅन्ड्रॉईड सेटअपमध्ये हा क्रमांक आपोआप सेव्ह होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत.  

नेमकं काय आहे प्रकरण?

लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये (फोनबुक) शुक्रवारी आधारचा हेल्पलाइन नंबर आपोआप सेव्ह झाला.  युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (यूआयएडीआय) यावर खुलासा करताना स्पष्ट केले आहे की, आम्ही कोणत्याही टेलिकॉम कंपनीला हेल्पलाइन नंबर युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फीड करण्यास सांगितले नाही. त्यामुळे हा हेल्पलाइन नंबर कसा काय आला, याची सोशल मीडियावर चर्चा आहे. फोनबुकमध्ये जो नंबर सेव्ह झाला, तो १८००-३००-१९४७ असा आहे. हा हेल्पलाइन नंबर जुना असल्याचे यूआयडीएआयने स्पष्ट केले. नवा टोल फ्री-नंबर १९४७ हा आहे.आधारचा हेल्पालाईन क्रमांक 1947 हा असून अद्यापही हा क्रमांक सेवेत आहे.  

फ्रेंच सुरक्षा तज्ज्ञ एलियट एल्डरसन यांनी ट्विट करून सवाल केला की, वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांच्या काही युजर्सच्या फोनमध्ये त्यांना माहीत नसताना आधार नंबर सेव्ह कसा काय झाला?

आधार चॅलेंज

काही दिवसांपूर्वीच ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधारच्या गोपनीयतेचा संदर्भ देत आपली माहिती हॅक करुन दाखवावी, असं आव्हान दिलं होतं. शर्मा यांनी ट्विटरवरुन आव्हान त्यांचा आधार क्रमांक शेयर करत त्याला लिंक केलेली माहिती जाहीर करण्याचं आव्हान दिलं होतं. यानंतर एका हॅकरनं शर्मा यांचा मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता, जन्म तारीख, पॅन क्रमांक अशी महत्त्वाची माहिती समोर आणली होती. 
 



 

Web Title: Google Takes the Blame for UIDAI Number Showing Up in People's Phonebooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.