नवी दिल्ली- मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाहीये. त्यामुळे मोबाईल क्रमांक आधारशी न जोडल्यास बंद होणार नाही, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभागानं दिलं आहे. आधारशी लिंक न केल्याच्या कारणास्तव मोबाईल कंपन्यांना कोणाचेही मोबाईल नंबर बंद करता येणार नाही, अशी माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे.

मोबाईल नंबर आधारला जोडण्याच्या केंद्राच्या सक्तीविरोधात अनेक ग्राहकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या असून, हा निर्णय न्यायालयात आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यामुळे मोबाईल नंबर आधारशी लिंक न केल्याच्या  कारणास्तव ग्राहकांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असं दूरसंचार विभागाच्या सचिव अरुणा सुंदराजन म्हणाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मोबाइल कंपन्यांना मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही. तसेच परदेशी असलेल्या लोकांशीही मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्यासंदर्भात आम्ही काम करत आहोत. 2018पासून आधार क्रमांकाच्या माध्यमातून ग्राहकांची सत्यता पडताळण्याचा मोबाईल कंपन्यांचा मानस आहे. 1 डिसेंबर 2017पर्यंत मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करायचा की नाही, याचा निर्णय होणार आहे, असंही दूरसंचार विभागानं सांगितलं आहे. परंतु अनेक मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना आधारला मोबाईल नंबर लिंक करा, अन्यथा नंबर बंद करू, अशा प्रकारचे मॅसेज येतायत. आधारला लिंक करण्याच्या नावाखाली मोबाईल कंपन्या ग्राहकांना घाबरवत असल्याचंही समोर आलं आहे. 
गेल्या काही दिवसांपूर्वी दूरसंचार मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व मोबाइल कंपन्यांना मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याचा आदेश दिला होता. दूरसंचार विभागाने 23 मार्च रोजी मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याचा आदेश जारी केला होता. केंद्र सरकारने बँक खात्यांप्रमाणे मोबाइल क्रमांकही आधार कार्डशी जोडणं अनिवार्य केलं होतं. लिंक न केल्यास एका ठराविक तारखेनंतर मोबाइल क्रमांक बंद केला जाईल, अशी भीतीही ग्राहकांना दाखवली जात होती. दुसरीकडे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना वेगवेगळ्या सेवांसाठी आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यास आपण तयार असल्याचं सांगितलं आहे.

'काय हवं ते करा, पण आधारला मोबाइलसोबत लिंक करणार नाही' - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपण आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. ममता बॅनर्जी बोलल्या आहेत की, 'मी आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नाही. जर त्यांना हवं असेल तर त्यांनी माझा मोबाइल क्रमांक बंद करुन टाकावा. पण मी आधार लिंक करणार नाही'. याचवेळी ममता बॅनर्जी यांनी लोकांनाही आपल्याला साथ देण्याचं आवाहन केलं आहे. कोलकाता येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ममता बॅनर्जी बोलल्या आहेत. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.