गोवा महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित, महाराष्ट्र नवव्या स्थानावर; प्लान इंडियाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 09:34 AM2017-11-02T09:34:42+5:302017-11-02T09:36:07+5:30

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यं महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहेत.

Goa is the safest place for women, Maharashtra ninth place; Plan India Report | गोवा महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित, महाराष्ट्र नवव्या स्थानावर; प्लान इंडियाचा अहवाल

गोवा महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित, महाराष्ट्र नवव्या स्थानावर; प्लान इंडियाचा अहवाल

Next
ठळक मुद्दे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यं महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहेत. ‘प्लान इंडिया’द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली - महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यं महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहेत. ‘प्लान इंडिया’द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. महिला सुरक्षेच्याबाबतीत महाराष्ट्र नवव्या स्थानावर आहे. देशातील राज्यांच्या कामगिरीची सरासरी काढल्यास महाराष्ट्राची कामगिरी थोडीफार चांगली आहे.

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा सर्वाधिक सुरक्षित असून बिहार सर्वाधिक असुरक्षित राज्य असल्याचं प्लान इंडियाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. बिहारसोबतच झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्लीसुद्धा महिलांसाठी असुरक्षित असल्याचं आकडेवारीनुसार स्पष्ट झालं आहे. तर गोव्यानंतर महिला सुरक्षेच्या बाबतीत केरळ, मिझोरम, सिक्कीम, मणीपूर या राज्यांचा नंबर लागतो.  प्लान इंडियाने तयार केलेला अहवाल बुधवारी महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केला. या अहवालात महिला सुरक्षेसह शिक्षण, आरोग्य, गरिबी हे मुद्देही मांडण्यात आले आहेत.

महिला सुरक्षेच्या बाबतीत देशातील राज्यांना शून्य ते एक असे गुण देण्यात आले. यामध्ये गोव्याला ०.६५६ गुण मिळाले आहेत. तर बिहारला सर्वात कमी म्हणजे ०.४१० गुण मिळाले आहेत. देशभरातील राज्यांच्या कामगिरीची सरासरी काढल्यास ती ०.५३१ इतकी होते. त्या तुलनेत महाराष्ट्राची कामगिरी चांगली आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर आहे. या बाबतीत महाराष्ट्राचा शेजारी असलेला गुजरात १६ व्या स्थानी आहे.

महिला सुरक्षेसह इतरही अनेक क्षेत्रांमध्ये गोव्याची कामगिरी चांगली झाली आहे. गोवा शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत पाचव्या, तर गरिबीच्या बाबतीत आठव्या स्थानी आहे. केरळमधील आरोग्य व्यवस्था सर्वात चांगली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधेच्या बाबतीत केरळ ०.६३४ गुणांसह देशात अव्वल आहे. महिला सुरक्षेसोबतच आरोग्य सुविधांच्या बाबतही बिहारची कामगिरी खराब असल्याचे आकडेवारीनुसार म्हणता येईल. आरोग्य सुविधांच्या बाबतीत बिहार ०.४१० गुणांसह तळाला आहे. याशिवाय गरिबीतही बिहारची स्थिती अत्यंत वाईट आहे.
 

Web Title: Goa is the safest place for women, Maharashtra ninth place; Plan India Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.