ठळक मुद्देपांरपारिक वेशभूषेत नटलेल्या तरुणी, महिला त्या तुटलेल्या काचांच्या रिंगणामध्ये गरब्याचा फेर धरतात.

अहमदाबाद - नवरात्री हा गुजरातमधला मोठा सण आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते दस-यापर्यंत संपूर्ण गुजरातमध्ये तरुण-तरुणी, अबालवृद्ध पारंपारिक गरबा, दांडियाच्या तालावर ठेका धरतात. गरबा, दांडिया खेळण तस फार कठिण नाही. पण जुनागढमधला गरबा पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. कारण जुनागढमध्ये तुटलेल्या काचाच्या तुकडयांवर गरब्याचा खेळ रंगतो. काचेच्या तुकडयांचे एक रिंगण तयार केले जाते. त्या रिंगणाच्या मध्यभागी दिव्यांची आरास मांडलेली असते. 

पांरपारिक वेशभूषेत नटलेल्या तरुणी, महिला त्या तुटलेल्या काचांच्या रिंगणामध्ये गरब्याचा फेर धरतात. त्यांच्या दोन्ही हातात मातीच्या भांडयामध्ये दिवे असतात. देवी आदी शक्तीला प्रसन्न करण्यासाठी महिला अशा प्रकारचा गरबा खेळतात. अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. महत्वाचं म्हणजे काचेच्या तुकडयांवर अनवाणी पायाने गरबा खेळूनही त्यांच्या पायामधून रक्त येत नाही. 

मुलींचा दृढ विश्वास असल्याने त्यांना कुठलीही दुखापत होत नाही असे एका महिलेने सांगितले. काचेच्या तुकडयांवर अनवाणी पायाने गरबा खेळणे ही अभिमानाची बाब आहे असे या प्रथेमध्ये सहभागी होणा-या एका महिलेने सांगितले.