दिल्लीची मोस्ट वॉन्टेड 'मम्मी' अखेर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 11:36 AM2018-08-19T11:36:03+5:302018-08-19T11:44:47+5:30

113 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या फरार लेडी गँगस्टरला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे.

finally bashiran begum arrested by delhi police | दिल्लीची मोस्ट वॉन्टेड 'मम्मी' अखेर गजाआड

दिल्लीची मोस्ट वॉन्टेड 'मम्मी' अखेर गजाआड

Next

नवी दिल्ली : 113 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या फरार लेडी गँगस्टरला अटक करण्यात दिल्लीपोलिसांना यश आलं आहे. बशीरन असं अटक करण्यात आलेल्या 62 वर्षीय महिलेचं नाव असून तिच्या गँगचे सर्व सदस्य तिला 'मम्मी' या नावाने संबोधत असल्याने ती त्याच नावाने सर्वत्र परिचित होती. 



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानची रहिवासी असलेली बशीरन 45 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये वास्तव्यास आली. तिथेच तिने अवैधरित्या दारूची विक्री करत छोटे मोठे गुन्हे करायला सुरुवात केली. त्यानंतर थोड्याच दिवसात ती 'मम्मी' या नावाने गुन्हे जगतात प्रसिद्ध झाली. न्यायालयाने 25 मे रोजी बशीरनला कुख्यात गुन्हेगार म्हणून घोषित केलं होतं. तसेच ती मागील आठ महिन्यांपासून फरार होती. कुटुंबीयांना भेटण्यासाठी बशीरन येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचला आणि अखेर तिला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.

बशीरन आणि तिच्या काही साथीदारांनी उत्तरप्रदेशमधील एका तरुणाच्या हत्येची सुपारी घेतली होती. तरुणाच्या सावत्र बहिणीनेच त्याला मारण्याची सुपारी दिली होती. त्यानंतर बशीरन आणि तिच्या साथीदारांनी तरुणाची गळा दाबून हत्या केली. तसेच त्याचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याने पोलिसांना गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य साथीदारांची माहिती दिली. मात्र तेव्हापासून बशीरन फरार होती. ह्त्या, दरोडा दारूची तस्करी, धमक्या देणे यासारखे अनेक गुन्हे तिच्या नावावर दाखल आहेत. त्यामुळे पोलीस फरार असलेल्या बशीरनचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते. शेवटी सापळा रचून अखेर पोलिसांनी तिला अटक केली आहे.

Web Title: finally bashiran begum arrested by delhi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.