प्रक्षेपणाच्या आधीच इंधनाच्या टाकीत आढळला दोष, चांद्रयान-२ जमिनीवरच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 06:17 AM2019-07-16T06:17:31+5:302019-07-16T06:17:46+5:30

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या बहुप्रतीक्षित चांद्रयान-२ ही मोहीम प्रक्षेपक जीएसएलव्ही मार्क ३ च्या इंधनाच्या टाकीत तांत्रिक दोष आढळल्याने स्थगित करण्यात आली.

The fault found in the fuel tank already before the launch, Chandrayaan-2 on the ground itself | प्रक्षेपणाच्या आधीच इंधनाच्या टाकीत आढळला दोष, चांद्रयान-२ जमिनीवरच

प्रक्षेपणाच्या आधीच इंधनाच्या टाकीत आढळला दोष, चांद्रयान-२ जमिनीवरच

googlenewsNext

- निनाद देशमुख 
श्रीहरीकोटा : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या बहुप्रतीक्षित चांद्रयान-२ ही मोहीम प्रक्षेपक जीएसएलव्ही मार्क ३ च्या इंधनाच्या टाकीत तांत्रिक दोष आढळल्याने स्थगित करण्यात आली. सोमवारी पहाटे प्रक्षेपणापूर्वी प्रक्षेपकाची तपासणी करताना ही त्रुटी आढळल्याने, मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १० दिवसांत बिघाडाच्या कारणांची तपासणी करून, त्यानंतर प्रक्षेपणाची पुढील तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण सोमवारी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी करण्यात येणार होते. त्यासाठी काउंटडाउनही सुरू झाले होते. प्रत्यक्ष प्रक्षेपणाला ५६ मिनिटे २४ सेकंद उरले असताना तांत्रिक दोष निर्माण झाला. यामुळे प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोतर्फे करण्यात आली.
प्रक्षेपणासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याचबरोबर, सुमारे ५ हजार जणांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण जगभरातून या प्रक्षेपणाचे वार्तांकन करण्यासाठी अनेक नामांकित वृत्त समूहांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
रात्री १० वाजता चेन्नई येथून विशेष गाडीतून पत्रकारांना हा सोहळा जगभरात दाखविण्यासाठी श्रीहरीकोटा येथे नेण्यात आले. सकाळपासून प्रक्षेपणाची उलटीगणती सुरू करण्यात आली होती.
इस्रोचे अधिकारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, प्रक्षेपणाच्या दरम्यान शास्त्रज्ञांना प्रक्षेपकात काही त्रुटी आढळल्या. यामुळे प्रेक्षपण स्थगित करण्यात आले असून, काही दिवसांत नवी तारीख जाहीर करण्यात येईल. मुख्य नियंत्रण कक्षातून शास्त्रज्ञ प्रत्येक क्षणाची माहिती देत होते. शास्त्रज्ञांची तयारी पाहण्यासाठी, तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी राष्ट्रपती या कक्षात उपस्थित होते. २ वाजता प्रक्षेपणाला ५६.२४ मिनिटे उरली होती.
यावेळी मोहीम प्रमुखांना प्रक्षेपकाच्या इंधनाच्या टाकीत त्रुटी आढळली. यामुळे प्रक्षेपण काही काळापुरते स्थगित केल्याचे सांगण्यात आले, परंतु मोहीम सुरू होण्यापूर्वीच इस्रोच्या शास्त्रज्ञांना ही तांत्रिक त्रुटी मोठी असल्याचे लक्षात आल्यामुळे, त्यांनी ही मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
>छोटीशी चूकही ठरू
शकते धोकादायक
अंतराळात यान सोडण्याच्या कुठल्याही मोहिमेत मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली जाते. छोट्याशा त्रुटींमुळे अपघाताची शक्यता असते. चांद्रयान-२ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. मोहिमेच्या यशासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ ११ वर्षांपासून झटत आहेत, यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.
यामुळे थोडीही त्रुटी ही संपूर्ण मोहीम उद्ध्वस्त करू शकते. यामुळेच तूर्तास प्रक्षेपण स्थगित करण्यात आले आहे. ही मोहीम यापूर्वीही दोनदा स्थगित करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसांत तांत्रिक बिघाड शोधल्यावर नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: The fault found in the fuel tank already before the launch, Chandrayaan-2 on the ground itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.