श्रीनगर : १ जुलैपासून लागू करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा करातून अत्यावश्यक वस्तू आणि धान्य यांना मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत. येथे सुरू असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय झाला.
दूध आणि दही यांच्यावर कर नसेल तर मिठाईवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या दोन दिवसीय बैठकीत एकूण १२११ पैकी १२०६ वस्तूंवर किती कर असावा याबाबत निर्णय झाला. नव्या दरांनुसार तेल, साबण आणि टूथपेस्ट अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंवर १८ टक्के कर लावण्यात येणार असून, यापूर्वी या वस्तूंवर २२-२४ टक्के कर लावण्यात येत होता. ८१ टक्के वस्तूंवर १८ टक्क्यांपेक्षा कमी जीएसटी लावण्यात येणार आहे.

जीएसटीचे दर निश्चित... 
- 07 टक्के वस्तूंना करातून सूट
- 14 टक्के वस्तूंवर ५ टक्के कर
- 43 टक्के वस्तूंवर १८ टक्के कर
- 19 टक्के वस्तूंवर २८ टक्के कर
- 17 टक्के वस्तूंवर १२ टक्के कर