- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) दाव्यांचा निपटारा कालावधी घटवून १0 दिवस केला आहे. आधी तो २0 दिवस होता. या निर्णयामुळे ईपीएफओमधून विविध कारणांखाली पैसे काढणे, निवृत्तीवेतन, तसेच विमा यासंबंधीचे दावे १0 दिवसांत निकाली निघतील.
या निर्णयाचा संघटनेच्या ४ कोटी सदस्यांना फायदा होईल. याआधी जुलै २0१५ मध्ये ईपीएफओने दाव्यांच्या निपटाऱ्याचा कालावधी घटवून २0 दिवस केला होता. १ मे २0१७ पासून संघटेनेने दावे निपटारा व्यवस्था आॅनलाईन केली. त्यामुळे कालावधी आणखी घटवून १0 दिवस करणे संघटनेला शक्य झाले आहे. आधार आणि बँक खात्यांची जोडणी असलेल्या सदस्यांचे दावे अर्ज मिळाल्यापासून तीन तासांत निकाली काढण्याची व्यवस्था उभी करण्याचा ईपीएफओचा प्रयत्न आहे, असे सूत्रांनी सांगितले.
ईपीएफओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दावे निपटारा कालावधी १0 दिवस करण्यात आला आहे, तसेच तक्रार निवारणासाठी १५ दिवसांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे.
श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी बंगळुरात आज ‘ईपीओ नागरिक सनद २0१७’चे विमोचन केले आहे. त्यात ही तरतूद आहे. ईपीएफओच्या कामात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी, तसेच पोहोच व्यवस्था आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी सनद जाहीर करण्यात आली आहे.