दिल्ली, हरयाणा, बंगाल मधील ५९ मतदारसंघांतील प्रचार संपला; उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 06:55 AM2019-05-11T06:55:22+5:302019-05-11T06:55:49+5:30

लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार असून, तेथील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला.

election campaign in 59 constituencies in Delhi, Haryana and Bengal ended; Voting tomorrow | दिल्ली, हरयाणा, बंगाल मधील ५९ मतदारसंघांतील प्रचार संपला; उद्या मतदान

दिल्ली, हरयाणा, बंगाल मधील ५९ मतदारसंघांतील प्रचार संपला; उद्या मतदान

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार असून, तेथील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, तसेच सप-बसप आघाडीचे नेते अखिलेश यादव व मायावती यांनी जाहीर सभा घेतल्या.
सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील सर्व १0, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होणार असून, तेथील सुमारे १0 कोटी १८ लाख मतदार आपला हक्क बजावू शकतील. या ५९ मतदारसंघांमध्ये ९७९ उमेदवार असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १ लाख १३ हजार १६७ इतकी आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, अजय माकन, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा, विजेंदर सिंह, तसेच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, मनेका गांधी, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, गौतम गंभीर, मनोज तिवारी, मीनाक्षी लेखी, गायक हंसराज हंस, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आपच्या आतिशी, राघव छड्डा आदी उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यात हरयाणा व दिल्लीतील सर्व मतदारसंघांत मतदान पूर्ण होईल. या टप्प्यात दिल्लीत आम आदमी पक्ष, भाजप व काँग्रेस यांच्यात कमालीची चुरस असून, हरयाणामध्येही भाजप, काँग्रेस व लोक दलाचे दोन गट यांच्यात प्रामुख्याने लढती पाहायला मिळतील. बिहारमध्ये भाजप-जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती पार्टी यांची युती आणि त्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्यात लढत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, माकप व भाजप अशा तिरंगी लढती होणार आहेत.
या ५९ मतदारसंघांमध्ये २0१४ साली ६४.२१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. सर्वाधिक मतदान त्यावेळी प. बंगालमध्ये (८५ टक्के) झाले होते, तर सर्वात कमी मतदान उत्तर प्रदेशात (५४.५५ टक्के) झाले होते. त्यामुळे यंदा या
जागांसाठी किती मतदान होते, हे
पाहायला हवे.

भाजपने जिंकल्या होत्या ४४

गेल्या निवडणुकीत या ५९ पैकी ४४ जागा भाजपने, तर दोन जागा त्याच्या मित्रपक्षाने जिंकल्या होत्या. काँग्रेसला दोन जागी विजय मिळाला होता, तर तृणमूलने आठ, इंडियन नॅशनल लोक दलाने दोन व समाजवादी पक्षाने एक जागा जिंकली होती. भाजपने गेल्या वेळी ज्या ४४ जागा जिंकल्या, त्यातील १९ खासदारांना भाजपने यंदा उमेदवारी दिलेली नाही.

Web Title: election campaign in 59 constituencies in Delhi, Haryana and Bengal ended; Voting tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.