कर्तृत्वास संकटांमुळे झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 02:55 AM2017-11-19T02:55:49+5:302017-11-19T07:21:38+5:30

काँग्रेसमधील फूट परिस्थितीने इंदिराजींवर लादली. व्ही. व्ही. गिरी यांना डावलून सिंडिकेटने नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी एकतर्फी ठरविली नसती, तर काँग्रेस फुटली नसती.

Due to crisis woes | कर्तृत्वास संकटांमुळे झळाळी

कर्तृत्वास संकटांमुळे झळाळी

Next

-प्रेम शंकर झा
(ज्येष्ठ पत्रकार)

काँग्रेसमधील फूट परिस्थितीने इंदिराजींवर लादली. व्ही. व्ही. गिरी यांना डावलून सिंडिकेटने नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी एकतर्फी ठरविली नसती, तर काँग्रेस फुटली नसती. काँग्रेस अध्यक्ष एस. निजिलिंगप्पा यांनी पदावरील पंतप्रधानांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा इंदिराजींना ताकद दाखवावी लागली. यात स्वार्थ होता, असे टीकाकार म्हणतात. पण पक्षाहून पंतप्रधानपदाचे व पक्ष संघटनेहून संसदीय पक्षाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांना बंड पुकारणे भग पडले.

इंदिरा गांधी या भारताच्या सर्वाधिक करिष्माई पंतप्रधान होत्या, तशाच वादग्रस्तही. काँग्रेसमध्ये दोन वेळा पाडलेली फूट, सत्ता स्वत:च्या हातात केंद्रित करण्यासाठी स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांना वारंवार बदलणे आणि आणीबाणी लादणे यावरून त्यांच्यावर लोकशाही खिळखिळी केल्याची टीका होते. देशाची आर्थिक धोरणे पार डाव्या टोकाला नेल्याबद्दल अर्थतज्ज्ञ त्यांना दोष देतात. पण माझ्या मते यापैकी कोणत्याही कारणावरून इंदिराजींना व्यक्तिश: दोष देणे अन्यायाचे होईल. उलट मी म्हणेन की हे सर्व टीकेचे मुद्दे त्या वेळी देशापुढे वा काँग्रेसपुढे उभी ठाकलेली गंभीर संकटे होती. यांवर इंदिराजींनी मात केल्यानेच त्यांच्या कर्तृत्वास झळाली आली.
इंदिराजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वामुळे, आता मागे वळून पाहताना, त्यांनी सत्ता स्वीकारली तेव्हाची परिस्थिती किती कठीण होती, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. अन्नधान्याची टंचाई, १९६२ व १९६५ मधील लागोपाठची दोन युद्धे, १९६५ चा भीषण दुष्काळ आणि आकाशाला भिडलेली महागाई व चलनवाढ यामुळे भारताची भुकेकंगाल अवस्था झाली होती. अशा वेळी इंदिराजींनी सत्तासूत्रे स्वीकारली तेव्हा त्यांच्यापुढील काँग्रेसमधील आव्हानेही कमी नव्हती. नेहरूंचा करिष्मा आणि मोराराजी देसार्इंपेक्षा जरा मवाळ म्हणून पक्षातील सिंडिकेटने त्यांची निवड केली, असे बहुतेकांना वाटते. पण नेहरूंच्या समाजवादी कारभाराने पक्षनेत्यांचा भ्रमनिरास झाला होता, हेही त्यामागचे एक कारण होते. इंदिराजींनी लगेचच रुपयाचे ५७ टक्के अवमूल्यन करून आपले धाडसी रूप दाखवून दिले. त्यानंतर हरित क्रांतीने भारताची स्थिती स्थिरस्थावर झाली.
सन १९७१ च्या निवडणुकीनंतर काही दिवसांतच बांगलादेशचे संकट उभे ठाकले आणि इंदिराजींनी पंतप्रधान कसा कणखर हवा, हे दाखवून दिले. प्रचंड देशाभिमान व सुस्पष्ट दृष्टिकोन याचे ते उदाहरण होते. पूर्व पाकिस्तानातून आलेले एक कोटी निर्वासित निमूटपणे सामावून घ्यावे, यासाठी पाश्चात्त्य नेते भारतावर दबाव आणत होते. पाकिस्तानचे तुकडे करण्याचे इंदिराजींनी आधीपासूनच पक्के ठरविले होते, असा सर्वमान्य समज आहे. पण तो बरोबर नाही.
निर्वासितांचे लोंढे असह्य झाले तेव्हा त्यांनी निवडणुकीचा निकाल मान्य करून अवामी लीगला पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन करू द्यावे, यासाठी जनरल याह्या खान यांचे मन वळविण्याचा आपल्या परीने खूप प्रयत्न केला. त्यात अपयश आले तेव्हा शेख मुजिबुर रेहमान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याकरता त्यांनी अनेक प्रमुख देशांमध्ये दूत पाठविले व स्वत:ही अनेक युरोपीय देश व अमेरिकेत जाऊन प्रयत्न केले. पण हे प्रयत्न फसलेच तर नाइलाजाने पूर्व पाकिस्तानवर चाल करण्याची दुसरी पर्यायी योजना त्यांनी तयार करून ठेवली. त्याचाच भाग म्हणून त्यांनी मुक्ती वाहिनीला प्रशिक्षण देण्याचे निर्देश भारतीय लष्करास दिले.
अशा प्रकारे प्रसंगी गाजर दाखवून किंवा दंडुका उगारून आपला हेतू जिद्दीने साध्य करून घेण्याची इंदिराजींची ही दुसरी वेळ होती. दोन्ही वेळा त्यांना यश आले. आधी व्ही. व्ही. गिरी यांची राष्ट्रपतीपदी निवड व नंतर बांगलादेशची निर्मिती हे त्याचे फलित होते. दोन्ही वेळेला त्यांनी नाइलाजाने शेवटचा उपाय म्हणून बळाचा वापर केला, असे दिसते.

Web Title: Due to crisis woes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.