Doctors Strike : पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा 'कोमात', 700 डॉक्टरांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 10:55 AM2019-06-15T10:55:34+5:302019-06-15T11:09:19+5:30

देशभरातील डॉक्टर सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे देशातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ 700 डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. 

Doctors Strike bengal healthcare in coma as over 700 doctors quit against mamta government | Doctors Strike : पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा 'कोमात', 700 डॉक्टरांचे राजीनामे

Doctors Strike : पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा 'कोमात', 700 डॉक्टरांचे राजीनामे

Next
ठळक मुद्देडॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ 700 डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.  डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत पश्चिम बंगाल सरकार पुरेसे गंभीर नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे.आंदोलनामुळे मुंबईसह महाराष्ट्र, तसेच दिल्ली व अनेक राज्यांतील आरोग्यसेवेवर विपरित परिणाम झाला आहे.

कोलकाता/नवी दिल्ली - कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर शुक्रवारी (14 जून) संपावर होते. डॉक्टरला मारहाण केल्यानंतर सुरू झालेल्या डॉक्टरांचे कामबंद आंदोलन आता देशभर पसरले असून, महाराष्ट्र, बिहार, नवी दिल्ली, गोवा, झारखंडसह अनेक राज्यांतील डॉक्टर त्यात सहभागी झाले  आहेत. आंदोलनाचा भाग म्हणून देशभरातील डॉक्टर सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे देशातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ 700 डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. 

डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत पश्चिम बंगाल सरकार पुरेसे गंभीर नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. सरकारच्या निषेधार्थ तब्बल 700 डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. या आंदोलनामुळे मुंबईसह महाराष्ट्र, तसेच दिल्ली व अनेक राज्यांतील आरोग्यसेवेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने डॉक्टरांशी चर्चा करून लवकर तोडगा काढावा, असे कोलकाता हायकोर्टाने बंगाल सरकारला सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी सरकारी डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, डॉक्टर आंदोलनावर ठाम आहेत.


दरम्यान, या आंदोलनामागे भाजप व डावे पक्ष असल्याचा आणि बाहेरचे लोक यात घुसल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी तेथील डॉक्टरांची मागणी आहे. याखेरीज रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन डॉक्टरांना पाहण्यास बॅनर्जी यांनी यावे व या हल्ल्याचा निषेध करावा, अशीही मागणी डॉक्टरांनी केली आहे. हल्लानंतर निष्काळजीपणा दाखविणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशीही मागणी डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांनी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, मुंबईतील डॉक्टरांनी डोक्यावर पांढरी पट्टी बांधून आंदोलन केले, तर दिल्लीतील डॉक्टरांनी हेल्मेट घातले होते. देशभर अनेक ठिकाणी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला.

ममता बॅनर्जीच जबाबदार

दिल्लीतील डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली आणि डॉक्टरांच्या आंदोलनात तोडगा काढण्याची, तसेच डॉक्टर व रुग्णालयांना सुरक्षा देण्याची मागणी केली. आरोग्यमंत्र्यांनी या आंदोलनाला ममता बॅनर्जी याच जबाबदार असल्याचा आरोप केला.


कोलकात्यातील मारहाणीचा महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रलमार्ड आणि इंटर्न डॉक्टरांची संघटना अस्मी यांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच, डॉक्टरांना सतत होणाऱ्या मारहणीच्या निषेधात न्याय देण्यासाठी एकत्र उभे राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध पत्रक काढले आहे. सरकार जागतिक स्तरावर आरोग्य योजना बनवण्यात व्यस्त आहेत. पण, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे. सरकार आम्ही कायदा हातात घेऊ याची वाटत पाहत आहे का, असा सवाल मार्डने उपस्थित केला. आमच्या सुरक्षेसाठी सरकारला वारंवार पत्र लिहून आणि विनंती करून थकलो आहोत. आता आमचा संयम संपलेला आहे. त्यामुळे आता कोणतीही पूर्वसूचना न देता कृती केली जाईल, असा इशारा मार्डच्या डॉक्टरांनी परिपत्रकात दिला. याशिवाय देशातील सर्व राज्यांच्या सरकारने राज्यातील रुग्णालयांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्रातल्या इंटर्न डॉक्टरांनी केली.


डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा

या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशपातळीवर सर्व डॉक्टर काळ्या फिती बांधून काम करणार आहेत. शिवाय संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये धरणे आंदोलन करून निषेध करण्याचे आवाहन आयएमएने दिले आहे. याखेरीज, इंडियन मेडिकल असोसिएशनने सातत्याने डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित शासकीय विभागांना पत्र पाठविण्याचे आवाहनही असोसिएशनच्या वतीने केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयएमएने दिली आहे.







 

Web Title: Doctors Strike bengal healthcare in coma as over 700 doctors quit against mamta government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.