'माझ्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 10:04 AM2019-02-19T10:04:48+5:302019-02-19T10:17:59+5:30

प्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका असं सांगितलं आहे. उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे सोमवारी (18 फेब्रुवारी) प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

'Do not expect any miracle from me' | 'माझ्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका'

'माझ्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका'

Next
ठळक मुद्देप्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका असं सांगितलं आहे. उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे सोमवारी प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी मतदारसंघात जाऊन काम करा असा सल्ला त्यांनी दिला.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील प्रभारी प्रियंका गांधी या निवडणुकीच्या रणांगणात पूर्ण ताकदीनिशी उतरल्या आहेत. प्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका असं सांगितलं आहे. उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे सोमवारी (18 फेब्रुवारी) प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी मतदारसंघात जाऊन काम करा असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच यावर सर्व निकाल अवलंबून असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

प्रियंका गांधी यांनी यावेळी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षातून बाहेर काढण्यात येईल असा इशाराही दिला आहे.  मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याची बैठकीदरम्यान प्रियंका गांधी यांनी चाचपणी केली. तसेच कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहेत. ‘मी या पदावर बसून कोणताही चमत्कार करु शकत नाही. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनीच पक्षाला मजबूत करण्याची गरज आहे. राज्यात पक्षाला बळ मिळावे यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे’, असं यावेळी प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

मी निवडणूक लढवणार नाही, पक्ष संघटना मजबूत करणार - प्रियंका गांधी 

काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारून राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांनी सुरुवातीपासूनच धडाकेबाज काम करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या पक्ष कार्यालयातील नेहरू भवनात त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर जवळपास 16 तास मॅरेथॉन बैठका घेतल्या होत्या. या बैठका पूर्ण रात्रभर सुरू होत्या त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यामध्ये मी निवडणूक लढवणार नाही, काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रियंका म्हणाल्या, माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कोणताही मुकाबला नाही. राहुल गांधीच मोदींना टक्कर देतील. जेव्हा प्रियंकांना मोदींशी दोन हात करणार का असा प्रश्न विचारला, त्यावेळी त्या म्हणाल्या मी निवडणूक लढणार नाही. मोदींशी मी नव्हे, तर राहुल गांधी मुकाबला करतील, असंही त्यांनी सांगितलं होतं.

प्रियंका गांधी यांच्या सक्रियतेनंतरही उत्तर प्रदेशात काँग्रेससमोर कठीण आव्हान असणार आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची संघटना खूपच कमकुवत आहे. 1989 साली उत्तर प्रदेशच्या सत्तेतून बाहेर झाल्यानंतर काँग्रेस पक्ष राज्यात उत्तरोत्तर कमकुवत होत गेला आहे. सध्या उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या केवळ 7 जागा त्यांच्याकडे आहेत. उत्तर प्रदेशात दलित आणि मुस्लिम हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार बसपा आणि सपा या प्रादेशिक पक्षांकडे वळला आहे. तर सर्वण मतदार दीर्घकाळापासून भाजपाच्या मागे उभा आहे. त्यामुळे पक्षापासून दुरावलेल्या मतदारांना पुन्हा काँग्रेसकडे वळवताना प्रियंका गांधी यांची कसोटी लागणार आहे. 2022 साली होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार करण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र राज्यात आधीच भक्कम असलेला भाजपा आणि आता नव्याने झालेली सपा-बसपा महाआघआडी यांना शह देण्यासाठी प्रियंका गांधी यांना मोठ्या प्रमाणावर पक्ष बांधणीचे काम हाती घ्यावे लागणार आहे.

 

Web Title: 'Do not expect any miracle from me'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.