मुलाने जुळवून आणला घटस्फोटित आईचा पुनर्विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 10:35 AM2019-06-18T10:35:06+5:302019-06-18T10:35:29+5:30

घटस्फोट घेतलेल्या आईला उर्वरित आयुष्यात आनंद मिळावा, यासाठी तिचा पुनर्विवाह जुळवणाऱ्या केरळच्या कोल्लममधील गोकुळ श्रीधर या २३ वर्षांच्या तरुणाचे कौतुक होत आहे.

Divorce mother's remarriage arrange by son | मुलाने जुळवून आणला घटस्फोटित आईचा पुनर्विवाह

मुलाने जुळवून आणला घटस्फोटित आईचा पुनर्विवाह

Next

तिरुवनंतपूरम : आपल्या वडिलांनी केलेल्या शारीरिक व मानासिक छळाला कंटाळून त्यांच्यापासून घटस्फोट घेतलेल्या आईला उर्वरित आयुष्यात आनंद मिळावा, यासाठी तिचा पुनर्विवाह जुळवणाऱ्या केरळच्या कोल्लममधील गोकुळ श्रीधर या २३ वर्षांच्या तरुणाचे कौतुक होत आहे.
गोकूळ इंजिनीअर असून तो इंदिरा गांधी मुक्त विद्यापाठातून बी. ए. करीत आहे. त्याने आई मिनी अयक्कन हिच्या पुनर्विवाहाची माहिती फेसबुक पोस्टवर टाकली. लोकांना हे आवडेल का, याची आपल्याला कदर नाही. तरीही स्त्रीला मन मारून जगावे लागू नये, ही लग्नामागची भूमिकाही श्रीधरने पोस्टमध्ये लिहिली. ती वाचून अनेकांनी त्याचे कौतुक केले. श्रीधरच्या आईचा पी. वेणु या निवृत्त कर्नलशी दुसरा विवाह झाला. वेणु विधूर असून त्यांचा मुलगा व मुलगी नोकरीनिमित्त केरळबाहेर राहतात.
मिनी अयक्कन यांचा पहिला विवाह झाला तेव्हा त्या शिक्षिका होत्या. श्रीधरच्या जन्मानंतर घरच्या कटकटींमुळे त्यांनी नोकरी सोडली. पतीच्या छळाला कंटाळून त्या घरातून बाहेर पडल्या तेव्हा श्रीधर शाळेत शिकत होता. नंतर त्यांनी लायब्ररीत नोकरी मिळविली. लायब्ररीतच सहकारी महिलेने अयक्कन यांना पुनर्विवाहासाठी वेणु यांचे स्थळ सुचविले. या उतारवयात पुन्हा लग्न करण्यास अयक्कन सुरुवातीस तयार नव्हत्या. पण श्रीधरने त्यांचे मन वळविले आणि लग्नगाठ जुळवून आणली.
श्रीधरने फेसबूकवर लिहिले की, एकदा वडिलांनी मारल्याने आईच्या कपाळातून भळाभळा रक्त वाहत होते. हे सहन करून तू इथे कशाला राहतेस, असे मी भावडेपणाने आईला विचारले होते. तिने माझ्यासाठी छळ सहन करत असल्याचे त्यावेळी सांगितले. ते माझ्या मनावर खोलवर कोरले गेले होते.
मोठे झाल्यावर आईला सुखात ठेवायचे, असे त्याने पक्क केले होते. आईने आपल्यासाठी कसा त्याग केला याची शिकून मोठे झाल्यावर कळू लागले. नोकरीनिमित्त कुठे बाहेर गेलो तर आई पुन्हा एकटी होईल, या चिंतेनेही मनात काहूर माजले. आईच्या पुनर्विवाहाचा विषय पुढे आला तेव्हा तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलविण्याचा आणि तिला तिचे आयुष्य जगू देण्याचा मार्ग म्हणून मलाही तो पटला. 
>...आणि तो ओक्साबोक्सी रडला
कौतुक करणाऱ्यांपैकी तामिळनाडूतून फोन केलेल्या तरुणाचे कथन श्रीधरच्या मनाला चटका लावून गेले. आपण तुझ्यासारखा आईच्या सुखाचा मार्ग शोधू शकलो नाही, असे सांगत हा अनोळखी इसम फोनवर ओक्साबोक्शी रडू लागला. फोन करणारा तरुण ३० वर्षांचा होता. वडिलांच्या अनिवार छळामुळे त्याच्या आईने आत्महत्या केली होती.

Web Title: Divorce mother's remarriage arrange by son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न