नवी दिल्ली : गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता, पण तेथील राज्यपालांनी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलाविले नाही. ही तर लोकशाहीची हत्या आहे, असे सांगत, राज्यपालांच्या भूमिकेबाबत तत्काळ चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेत सोमवारी केली.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी नियम १६८नुसार याबाबतचा प्रस्ताव दिला. यावर कधी विचार होणार आहे? असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर उप सभापती पी. जे. कुरियन यांनी सांगितले की, याबाबतची दिग्विजय सिंह यांची नोटीस मिळाली आहे. त्यावर विचार करण्यात येत आहे. सभापतींनी यावर निर्णय घेतल्यानंतर कळविण्यात येईल. दिग्विजय म्हणाले की, राज्यपालांनी दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षाला भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करून लोकशाहीची हत्या केली आहे. आनंद शर्मा म्हणाले की, भाजपाने खोटेपणाने हा जनादेश चोरला आहे.