ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - हेमा मालिनी रोज बंपर दारू पितात, पण अजून आत्महत्या नाही केली, असं वादग्रस्त विधान करणारे आमदार बच्चू कडू हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.  अभिनेत्री हेमा मालिनी या आमदार बच्चू कडू यांना कोर्टात खेचणार आहेत. बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यानंतर धर्मेंद्र चांगलेच संतापले होते, ते तर त्यांना मारणार होते असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत. द क्विंटने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्याकडे मी दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला होता कारण मला त्यांना फुकटची प्रसिद्धी द्यायची नव्हती. पण माझ्या जवळच्या व्यक्तींनी त्याला चांगलाच धडा शिकव असं सांगितलं. धर्मेंद्र तर इतके संतापले होते की, ते त्यांना मारणारच होते. शत्रुघ्न सिन्हा यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला. माझ्या मुली आणि जावई देखील कडू यांच्या वक्तव्यामुळे दुखावले गेले आहेत. याबाबत मी माज्या वकिलांसोबत चर्चा केली असून त्यांना कोर्टात खेचण्याची तयारी सुरू आहे. त्यांना माझी सार्वजनीकरित्या माफी मागावी लागेल. त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला जाईल, असं हेमा मालिनी म्हणाल्या. 
 
यापुर्वी हेमा मालिनी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्यानंतर अडचणी वाढताना पाहून आमदार बच्चू कडू यांनी सारवासारव केली होती. हेमा मालिनी चित्रपटात दारु पितात, त्यामुळे आपण असं वक्तव्य केल्याचं बच्चू कडू यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं. ‘मी हेमामालिनी यांचे चित्रपट जास्त पाहतो. त्या चित्रपटांमध्ये त्या जास्त दारु पिताना दिसतात. म्हणूनच मी हेमा मालिनी दारु पितात’ असं बोललो होते अशी सारवासारव बच्चू कडू यांनी केली. 
 
शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, या मुद्यावर प्रतिक्रिया देत असताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी "हेमा मालिनी रोज बंपर दारू पितात, पण अजून आत्महत्या नाही केली", असं वादग्रस्त विधान केलं होतं.