चंदीगड - धुरक्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढल्याने दिल्लीकरांना सध्या जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.  पंजाब आणि हरयाणातील शेतकरी शेतातील पाचट जाळत असल्याने होणारा धूर दिल्लीतील प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना शेतातील पाचट जाळण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. मात्र दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा आमदारच शेतातली पीक जाळत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 
पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते सूरपाल खैरा हे शेतात पिक जाळताना दिसत आहेत.  दरम्यान, सुरपाल खैरा यांनी आपण येथील शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी शेतातील पिक जाळत असल्याचे म्हटले आहे. खैरा यांनी 15 ऑक्टोबरला लुधियानामधील समराला येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यांनी शेतातील पाचट जाळल्यामुळे शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या अटकेच्या विरोधात आपल्या शेतातील पीक जाळून निषेध नोंदवला होता. 
 शेतातील पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश देणाऱ्या  पंजाब सरकारविरोधातील हे आंदोलन असल्याचा दावा सुरपाल खैरा यांनी केला आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांना त्रास देणे बंद केले पाहिजे, तसेच शेतामधील पाचटीची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना आवश्यक असलेली साधने उपलब्ध करून दिली पाहिजे, असेही खैरा म्हणाले.  
दिल्लीला धुरक्यापासून वाचवण्यासाठी केजरीवाल यांनी पंजाब आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतातील पाचट जाळल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर तिन्ही राज्यांनी मिळून उपाय शोधला पाहिजे, असे सूचवले होते. त्याला उत्तर देताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या कामात राज्याची नव्हे तर केंद्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. तर खट्टर यांनी हरयाणा सरकार आपल्या पातळीवर योग्य ती कारवाई करत असल्याचे उत्तर दिले होते.  
  दिल्लीत घेतला जाणारा प्रत्येक श्वास विषारी झाला असून, राजधानीची स्थिती गॅस चेंबरसारखी झाली आहे. खुल्या हवेत श्वास घेणेही कठीण झाले असून, लोक मास्क लावून बाहेर पडत आहेत. प्रदूषित हवेमुळे
शाळकरी विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाल्याने उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. घनटाद धुक्यामुळे पंजाब, हरयाणा व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात झालेल्या अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वसाधारण हवेच्या तुलनेत २० पट घनदाट आणि प्रदूषणाचे मिश्रण असलेले धुरके दिल्लीत पसरलेले आहे. यामुळे दिवसा दृश्यमानता कमी झाली होती. धुरक्यामध्ये फिरताना अनेकांच्या डोळ्यांची जळजळ होत होती. अनेकांना श्वसनाचे, खोकल्याचे विकार होत आहेत. डोळ्यांमध्ये आग होणे, अंगाला खाज सुटण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गतवर्षीेच्या तुलनेत यंदा प्रदूषण जास्त आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.